Join WhatsApp group

Ads

शेलूवेताळच्या २४ लाखांच्या कामांवर आरोप–प्रत्यारोप; चौकशीची घोषणा, पण अधिकारीच अनुपस्थित

By Sarkar Maza

March 15, 2026 7:36 am

Ads

मुर्तिजापूर (दिनांक १५) – शेलूवेताळ येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती विकास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या सुमारे २४ लाख रुपयांच्या रस्ता व नाली बांधकामावरून सुरू असलेला वाद अधिकच चिघळत आहे. काम निकृष्ट दर्जाचे असून निधीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी तक्रार केली असताना प्रशासनाने चौकशीची घोषणा केली; मात्र नियोजित दिवशी अद्याप अधिकारीच स्थळावर पोहोचले नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गट ग्रामपंचायत शेरवाडी (शेलूवेताळ) येथे आंबेडकर नगर व फुले नगर भागात प्रत्येकी १२ लाख रुपये खर्चाच्या सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकामाची कामे मंजूर झाली होती. मात्र ही कामे निकृष्ट दर्जाची असून काही कामे मागासवर्गीय वस्तीत न करता दुसऱ्याच ठिकाणी करण्यात आल्याचा आरोप तक्रारदार जितेंद्र रामदास अनभोरे यांनी केला आहे.

या तक्रारीची दखल घेत पंचायत समिती स्तरावरून संबंधित अधिकाऱ्यांना शेलूवेताळ येथे प्रत्यक्ष पाहणी करून तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र ठरलेल्या दिवशी आणि वेळेनंतरही अधिकारी चौकशीसाठी न पोहोचल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे. “चौकशीची घोषणा झाली, पण अधिकारीच आले नाहीत,” अशी चर्चा गावात रंगली आहे.

दरम्यान, काल झालेल्या शासनाच्या जनसंवाद कार्यक्रमातही हे प्रकरण पुढे आले. तक्रारदारांनी आमदार हरीश पिंपळे यांना निवेदन देत कामांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर आमदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रकरणाची दखल घेऊन आवश्यक ती तपासणी करण्याच्या सूचना दिल्याची माहिती मिळाली आहे.

दुसरीकडे, ग्रामपंचायत प्रशासनाने सर्व आरोप फेटाळले आहेत. ग्रामसचिवांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, कामांमध्ये कोणतीही तफावत नाही आणि सर्व कामे नियम व कायद्याच्या चौकटीतच करण्यात आली आहेत. तक्रारदाराला कामांची माहिती देण्यास आम्ही तयार होतो, मात्र त्यांनी ती स्वीकारली नाही, असा दावा ग्रामसचिवांनी केला.

यावर तक्रारदारांनीही प्रत्युत्तर देत प्रशासनाकडून देण्यात आलेली माहिती अपूर्ण असल्यामुळेच ती स्वीकारली नसल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, चौकशीसाठी अधिकारी कधी येणार आणि या आरोपांमध्ये नेमके सत्य काय आहे हे पुढील घडामोडींवर अवलंबून असणार आहे. त्यामुळे शेलूवेताळमधील या २४ लाखांच्या विकासकामांभोवतीचा वाद सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!