Join WhatsApp group

Ads

शेलूवेताळमध्ये २४ लाखांच्या कामांवर भ्रष्टाचाराचा वास; तक्रारीनंतर पंचायत समितीची चौकशी आज

By Sarkar Maza

March 12, 2026 10:55 am

Ads

मुर्तिजापूर (दिनांक १२ ) – मुर्तिजापूर तालुक्यातील गट ग्रामपंचायत शेरवाडी (शेलूवेताळ) येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती विकास योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या सुमारे २४ लाख रुपयांच्या रस्ता व नाली बांधकामावर गंभीर अनियमिततेचे आरोप समोर आले आहेत. स्थानिक नागरिक जितेंद्र रामदास अनभोरे यांनी केलेल्या तक्रारीनंतर पंचायत समिती प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेत आज (१२ मार्च) सकाळी १०.३० वाजता प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पंचायत समिती मुर्तिजापूर यांच्या आदेशानुसार शेरवाडी (शेलूवेताळ) येथील आंबेडकर नगरमध्ये सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकामासाठी १२ लाख रुपये आणि फुले नगर येथे सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकामासाठी १२ लाख रुपये अशी दोन कामे मंजूर करण्यात आली होती. मात्र ही कामे अपूर्ण असून केलेले बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारदार जितेंद्र अनभोरे यांच्या मते, मंजूर कामांपैकी फुले नगर येथील काम हे मागासवर्गीय वस्तीमध्ये न करता दुसऱ्याच ठिकाणी, म्हणजेच तथाकथित ‘सुवर्ण वस्ती’मध्ये केल्याचा संशय आहे. त्यामुळे या प्रकरणात ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सचिव यांनी संगनमत करून निधीचा अपव्यय व भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

या संदर्भात पंचायत समिती कार्यालयाने ग्रामपंचायत अधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांना आज शेलूवेताळ येथे उपस्थित राहून कामांची प्रत्यक्ष पाहणी व तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. तक्रारीच्या अनुषंगाने कामांची गुणवत्ता, प्रत्यक्ष ठिकाण आणि मंजुरीनुसार काम झाले आहे की नाही याची पडताळणी केली जाणार आहे.

दरम्यान, ही तक्रार राज्याच्या मागासवर्गीय विकास मंत्रालय, जिल्हा परिषद अकोला येथील मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच समाजकल्याण अधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आली असल्याने या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आज होणाऱ्या पाहणीत जर काम निकृष्ट दर्जाचे किंवा नियमबाह्य आढळले, तर संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेलूवेताळ ग्रामपंचायतीतील या कामांबाबतचा वाद आता अधिकच चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!