Join WhatsApp group

Ads

महिला दिनानिमित्त भातकुली पोलीस ठाण्यात खेळाडू विद्यार्थ्यांसह महिला कर्मचाऱ्यांचा गौरव

By Sarkar Maza

March 12, 2026 9:02 am

Ads

भातकुली – जागतिक महिला दिनानिमित्त भातकुली पोलीस ठाण्यात खेळाडू विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळा व छोगालाल राठी विद्यालय, भातकुली येथील तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर वैयक्तिक तसेच सांघिक क्रीडा स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष आमंत्रित करून त्यांचा सत्कार करण्यात आला.

खेळ प्रभारी इरफान खान नियामत खान यांनी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांसह विद्यार्थ्यांना भातकुली पोलीस ठाण्यात भेट देण्यासाठी आणले होते. यावेळी विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यातील विविध विभागांचे कामकाज प्रत्यक्ष दाखवून त्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विद्यार्थ्यांचा पोलीस प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

तसेच जागतिक महिला दिनानिमित्त भातकुली पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस अंमलदार तसेच उपस्थित महिला शिक्षिकांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना “पोलीस हे जनतेचे मित्र आहेत” हा संदेश देत अडचणीच्या प्रसंगी पोलिसांशी कसा संपर्क साधावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय गुड टच–बॅड टच, सायबर क्राईम, पोक्सो कायदा आणि अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयीही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करून त्यांना जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन भातकुली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र राजुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!