Join WhatsApp group

Ads

--

पाण्यावरून अकोला महापालिकेत राजकारण तापले; सत्ताधारी-विरोधक दोघेही आक्रमक

By Sarkar Maza

March 11, 2026 9:55 am

Ads

अकोला | प्रतिनिधी | दि. ११ मार्च २०२६

अकोला शहरातील अनियमित पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून मंगळवारी झालेल्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत चांगलीच खडाजंगी झाली. विरोधकांसोबतच सत्ताधारी नगरसेवकही प्रशासनावर आक्रमक झाल्याचे चित्र दिसून आले. शहरात अनेक भागात ७ ते ८ दिवसांनंतर पाणी मिळत असल्याने नागरिक त्रस्त झाले असून, परिस्थिती सुधारली नाही तर प्रशासनाने “याद राखावी”, असा इशारा नगरसेवकांनी दिला.

स्थायी समितीची सभा सभापती विजय अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेत जलप्रदाय विभागाचे अधिकारी डोईफोडे यांनी पाणीपुरवठ्याबाबत माहिती दिली. मात्र त्यांच्या उत्तरांवर नगरसेवकांनी समाधान व्यक्त केले नाही. वंचित बहुजन आघाडीचे नीलेश देव, काँग्रेसचे फलउर्र रहेमान, भाजपचे विनोद मापारी आणि शिवसेना (उबाठा)चे सागर भारुका यांनी पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून प्रशासनाला जाब विचारत तीव्र नाराजी व्यक्त केली.

नगरसेवकांनी सांगितले की, शहराला काटेपूर्णा प्रकल्पातून पिण्याचे पाणीपुरवठा केला जात असून सध्या साठा ४७ टक्के आहे. तरीही जुन्या शहरात ७ ते ८ दिवसांनी पाणी मिळते, तर हद्दवाढ भागात परिस्थिती आणखी गंभीर आहे. अनेकदा जलशुद्धीकरण केंद्र किंवा मुख्य जलवाहिनीमध्ये बिघाड नसतानाही ३ ते ४ दिवसांनीच पाणीपुरवठा केला जात असल्याचा आरोपही नगरसेवकांनी केला.

काही ठिकाणी पाणीपुरवठ्याची वेळ सांगितली जाते ती प्रत्यक्षात पाळली जात नाही, असेही सभेत निदर्शनास आले. दुपारी १२ ते १ वाजता पाणी सोडण्याचे सांगितले जाते; मात्र प्रत्यक्षात २ ते ३ वाजल्यानंतर पाणी येते. काही वेळा संध्याकाळी ५ वाजता सुरू झालेला पुरवठा रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहतो. काही व्हॉल्व मॅन स्वतःच्या सोयीनुसार पाणी सोडत असल्याचा आरोपही नगरसेवकांनी केला. या पार्श्वभूमीवर सभापतींनी सर्व नगरसेवकांना त्यांच्या भागातील समस्या लेखी स्वरूपात सादर करण्याचे निर्देश दिले.

सभेदरम्यान पाण्याच्या प्रश्नावरून शिवसेना, काँग्रेस आणि वंचितच्या नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे भाजपचे काही नगरसेवकही प्रशासनावर टीका करताना दिसून आले. शहरातील पाणीप्रश्न हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने त्यावरून राजकीय कुरघोडी सुरू झाल्याचे चित्र सभेत पाहायला मिळाले.

दरम्यान, अनेक ठिकाणी पाण्याचा प्रेशर नसल्याने नागरिकांना पाणी मिळत नाही. आधीच ७ ते ८ दिवसांनी पाणी येत असताना त्याच दिवशी पाइपलाईन दुरुस्तीची कामे केली जातात, त्यामुळे पुरवठा आणखी विस्कळीत होतो, असेही नगरसेवकांनी निदर्शनास आणले. यावर तांत्रिक कारणांमुळे अनियमितता होत असल्याचे अभियंत्यांनी सांगितले. मात्र कोणताही तांत्रिक बिघाड नसताना पाणीपुरवठा खंडित का होतो, असा सवाल करत नगरसेवकांनी अभियंत्यांना धारेवर धरले.

पाण्याच्या टाक्यांची नियमित स्वच्छता होत नसल्याने अनेकदा गढूळ पाणीपुरवठा होतो, अशी तक्रारही करण्यात आली. “अकोलेकरांच्या जीवाशी खेळ करू नका,” अशा शब्दांत नगरसेवकांनी प्रशासनाला सुनावले. अखेर सभापतींनी संबंधित विभागांची तातडीने बैठक घेऊन पाणीपुरवठ्याचा प्रश्न निकाली काढण्याचे आदेश दिले. दोषी आढळल्यास व्हॉल्व मॅनवर कारवाई करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!