Join WhatsApp group

Ads

खारपाण्याने जनता आजारी; आ. हरिषभाऊ पिंपळे यांनी सभागृहात सरकारला जाब

By Sarkar Maza

March 10, 2026 12:16 pm

Ads

मुंबई : दिनांक १०: अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यासह १०५ गावांच्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामामुळे हजारो नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा गंभीर मुद्दा मंगळवारी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुन्हा एकदा ऐरणीवर आला. आमदार हरिषभाऊ पिंपळे यांनी हा प्रश्न सभागृहात जोरदारपणे उपस्थित करत सरकारला जाब विचारला.

याआधी लक्षवेधी क्रमांक ७ अंतर्गत तिवसाचे आमदार राजेश वानखडे यांनीही या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले होते. त्याला पाठिंबा देत आ. पिंपळे यांनी या योजनेची दयनीय अवस्था आणि त्यातून निर्माण झालेली आरोग्याची भीषण समस्या अधोरेखित केली.

मिळालेल्या माहितीनुसार, २०२०-२१ मध्ये मंजूर झालेली ही पाणीपुरवठा योजना आजही कागदावरच अडकलेली आहे. परिणामी खारपण पट्ट्यातील अनेक गावांतील नागरिकांना आजही दूषित व खारट पाणी पिण्याची वेळ येत आहे. या पाण्यामुळे परिसरात किडनीच्या आजारांचे प्रमाण वाढत असल्याची धक्कादायक बाबही सभागृहात मांडण्यात आली.

या पार्श्वभूमीवर आ. पिंपळे यांनी सरकारकडे ठोस मागणी करत सांगितले की, केंद्र सरकारच्या निधीची वाट पाहत बसण्याऐवजी राज्य सरकारने आवश्यक असल्यास कर्ज उचलूनही पाणीपुरवठा विभागाला एकरकमी निधी द्यावा आणि ही योजना तातडीने पूर्ण करावी.“खारपण पट्ट्यातील जनतेचा जीव धोक्यात घालून विकासकामे प्रलंबित ठेवणे अक्षम्य आहे.

नागरिकांना शुद्ध पाणी देणे हे सरकारचे प्राथमिक कर्तव्य असून या योजनेला तातडीने गती देणे आवश्यक आहे,” असा कडक इशारा आ. हरिषभाऊ पिंपळे यांनी दिला.

दरम्यान, या प्रश्नामुळे अमरावती जिल्ह्यातील पाणीटंचाई आणि खारपाण्याच्या समस्येवर पुन्हा एकदा मोठा राजकीय आणि सामाजिक चर्चेचा भडका उडाला आहे. आता सरकार या योजनेला प्रत्यक्ष गती देणार की पुन्हा आश्वासनांचीच पखरण होणार, याकडे १०५ गावांतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!