Join WhatsApp group

Ads

-

‘सर्वजन सुखाय, सर्वजन हिताय’चा संदेश देणारा भव्य शासकीय महामेळावा, न्याय, प्रशासन आणि जनतेचा संगम; ४० योजनांचे एकाच छताखाली मार्गदर्शन

By Sarkar Maza

February 22, 2026 7:39 pm

Ads

मूर्तिजापूर, (एल.डी.सरोदे) : दिनांक : २२
“समाजातील लाखो मदतीच्या हातांमुळेच आपण पुढे आलो आहोत. आपल्या मूळ गावाला थोडा वेळ देऊन सामाजिक बांधिलकीतून प्रत्येकाने आपला वाटा उचलला तर समाजात मोठा सकारात्मक बदल घडू शकतो,” असे प्रतिपादन न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी केले.

दिनांक २२ रोजी मूर्तिजापूर तालुक्यातील शेलू वेताळ येथील वेताळ बाबा देवस्थान परिसरात आयोजित शासकीय सेवा योजना महामेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. हा महामेळावा राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अकोला, जिल्हा सर्व वकील संघ तसेच विविध शासकीय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. ‘सर्वजन सुखाय, सर्वजन हिताय’ हे सूत्र डोळ्यासमोर ठेवून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.

दिमाखदार आणि पर्यावरणपूरक सुरुवात

कार्यक्रमाची सुरुवात रोपट्याला पाणी घालून करण्यात आली. लेझीम पथकाच्या गजरात मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. जिल्हा महिला सक्षमीकरण केंद्र, अकोला यांच्या वतीने महिला सक्षमीकरण, रोजगारनिर्मिती व विविध योजनांवर आधारित पथनाट्य सादर करण्यात आले.

मान्यवरांची उपस्थिती

मंचावर न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके, न्यायाधीश शिवाजी कचरे, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, मुख्य कार्यपालन अधिकारी अनिता मेश्राम, आमदार हरीश पिंपळे, न्यायाधीश आर. एन. बंसल, न्यायाधीश आसिफ तांबोळी, माजी न्यायमूर्ती संजय मेहरे, उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार, तहसीलदार शिल्पा बोबडे, अॅड. अजय वाघमारे, अॅड. मोतिसिंह मोहता आदी मान्यवर उपस्थित होते. प्रकाशवाटच्या विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचे स्वागत केले.

पोलीस प्रशासनाचा डिजिटल पुढाकार

पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या व्हॉट्सॲप चॅटबॉटची माहिती दिली. तसेच ‘रक्षा’ क्यूआर कोडच्या माध्यमातून पोलीस ठाण्यातील सेवांबाबत नागरिकांना थेट अभिप्राय देता येणार असल्याचे सांगितले.

न्यायव्यवस्थेचा केंद्रबिंदू – सामान्य नागरिक

कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायाधीश शिवाजी कचरे यांनी “संपूर्ण न्यायव्यवस्थेचा केंद्रबिंदू सामान्य नागरिक असून आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक प्रगतीसाठी सर्वांना न्याय मिळणे आवश्यक आहे,” असे सांगितले. यासाठी ४० माहिती केंद्रे सुरू करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

योजनांची माहिती देणारे ४० स्टॉल

महामेळाव्यात विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी ४० स्टॉल उभारण्यात आले होते. शेवटच्या घटकापर्यंत न्याय व शासकीय लाभ पोहोचविण्यावर भर देण्यात आला. तालुक्यातील सरपंच, पोलिस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. सुनील कांबे (अध्यक्ष, मूर्तिजापूर वकील संघ) यांनी केले. संपूर्ण आयोजन व नियोजन उत्कृष्ट झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!