Join WhatsApp group

Ads

-

संपादकीय लेख : लोकप्रतिनिधी कोण? व्यासपीठावरून उमटतोय वेगळाच संकेत

By Sarkar Maza

February 21, 2026 2:54 pm

Ads

शहरातील सामाजिक व राजकीय कार्यक्रमांचा दर्जा उंचावण्यासाठी आयोजित होणारे उपक्रम सध्या वेगळ्याच चर्चेचे केंद्र बनले आहेत. कार्यक्रमांचा मूळ उद्देश बाजूला पडत असून स्वागत-सत्कारांच्या वाढत्या प्रसिद्धीमुळे व्यासपीठ गजबजलेले दिसते. दुपट्टे, शाल-श्रीफळ, गुलदस्ते यांचा वर्षाव आणि त्यासाठी खर्च होणारा वेळ व पैसा — या सर्वांमुळे कार्यक्रमाची दिशा भरकटत असल्याची टीका होत आहे.

सन्मान हा परंपरेचा भाग आहे; मात्र जेव्हा तो केवळ प्रसिद्धीचे साधन बनतो, तेव्हा त्याचे गांभीर्य कमी होते.

विशेषतः काही कार्यक्रमांमध्ये नगरसेविकांसोबत त्यांच्या पतींचाही स्वतंत्र सत्कार होत असल्याचे चित्र दिसते. यामुळे खर्च वाढतो, वेळ खर्ची पडतो आणि आयोजकांची कसरत वाढते. पण यापेक्षा गंभीर प्रश्न सामाजिक संकेतांचा आहे.

काही नगरसेवकांनी नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत नगरसेविकांच्या पतींचा नगरपरिषद कामकाजात हस्तक्षेप होऊ नये, अशी मागणी केली होती. त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांकडून अधिकृत पदावर नसलेल्या व्यक्तींनी प्रशासनिक कामकाजात हस्तक्षेप करू नये, असा स्पष्ट संदेश देणारे पत्रही काढण्यात आले.

म्हणजे प्रशासनिक स्तरावर मर्यादा आखण्याचा प्रयत्न झाला आहे.मात्र सामाजिक कार्यक्रमांच्या व्यासपीठावर जेव्हा नगरसेविकांच्या पतींचा ठळकपणे सन्मान होतो, तेव्हा जनमानसात वेगळाच संदेश जातो.

काही वेळा हा सन्मान केवळ सौजन्यापुरता न राहता, “प्रत्यक्षात मीच नगरसेवक आहे,” अशी प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न तर नाही ना? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. लोकशाही व्यवस्थेत निवडून आलेली व्यक्तीच अधिकृत प्रतिनिधी असते; तिच्या पदाचा सन्मान राखणे हेच खरे लोकशाहीचे भान आहे.

सामाजिक कार्यक्रम हे व्यक्तीप्रदर्शनाचे व्यासपीठ नसून विचार आणि कार्य मांडण्याची संधी असते. पदाचा आभास निर्माण करण्यासाठी किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी होणारी अनावश्यक उपस्थिती आणि सत्कार यामुळे लोकशाहीतील भूमिकांची सीमारेषा धूसर होण्याचा धोका आहे.

आज गरज आहे ती साधेपणाची आणि स्पष्ट भूमिकेची. एकाच शाल-श्रीफळातून सामूहिक स्वागत, मर्यादित औपचारिकता आणि विषयकेंद्रित कार्यक्रम — यामुळे आयोजकांचा वेळ, पैसा आणि ऊर्जा वाचेल. त्याहून महत्त्वाचे म्हणजे लोकशाही मूल्यांचा सन्मान राखला जाईल.

सन्मान हा कार्यातून मिळतो, तो केवळ व्यासपीठावरील प्रसिद्धीतून नव्हे. सामाजिक भान आणि मर्यादा यांचे भान सर्वांनी ठेवले, तरच कार्यक्रमांचा खरा उद्देश साध्य होईल आणि लोकप्रतिनिधी पदाची प्रतिष्ठा अबाधित राहील.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!