Join WhatsApp group

Ads

अल्पवयीन मुलीवर मारहाण व लैंगिक अत्याचार झाल्याचा गंभीर प्रकार समोर

By Sarkar Maza

February 17, 2026 4:13 pm

Ads

अकोला, दि. १७ फेब्रुवारी २०२६ : अकोट फाइल पोलीस ठाण्याच्या हद्दीत 16 फेब्रुवारी 2026 रोजी अल्पवयीन मुलीवर मारहाण व लैंगिक अत्याचार झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून या प्रकरणी सोहेल खान जमीर खान (रा. अकोट फाइल, अकोला) याच्याविरुद्ध विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, पिडीतेचे बाबा यांनी नमूद केले आहे की, त्यांच्या तीनही अल्पवयीन मुली आईसोबत संजयनगर, नायगाव येथे राहत आहेत. दि. 16 फेब्रुवारी रोजी सकाळी मुलीकडून आलेल्या फोनमध्ये आईच्या ओळखीतील व्यक्तीने मारहाण केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर संबंधित ठिकाणी जाऊन चौकशी केली असता मोठ्या मुलीनेही आरोपीविरुद्ध गंभीर स्वरूपाचे आरोप केल्याचे तक्रारीत नमूद आहे.


तक्रारीनुसार, आरोपी हा घरात येऊन मुलींशी अनुचित वर्तन करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विरोध केल्यास मारहाण केल्याचेही सांगण्यात आले आहे. या घटनेची दखल घेत अकोट फाइल पोलीसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.


या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 कलम 115(2), 74, 75, 75(1) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) 2012 कलम 8 व 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित कलमे अल्पवयीन मुलांवरील अत्याचार व लैंगिक शोषणाशी संबंधित गंभीर स्वरूपाची असून दोष सिद्ध झाल्यास कठोर शिक्षेची तरतूद आहे.


दरम्यान, पोलिसांकडून पीडित मुलींचे जबाब नोंदविणे, वैद्यकीय तपासणी व इतर पुरावे संकलित करण्याची प्रक्रिया सुरू असून तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.


या घटनेमुळे बालक व महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी समाजानेही जागरूक राहण्याची गरज व्यक्त होत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!