Join WhatsApp group

Ads

-

गोवंश तस्करी उघडकीस; कत्तलीच्या इराद्याने नेत असलेले ४ बैल जप्त, २ अटकेत

By Sarkar Maza

February 15, 2026 7:34 pm

Ads

बोरगावं मंजू : १५ फेब्रुवारी २०२६
अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीसांनी कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने बांधून मारहाण करत नेत असलेल्या चार गोवंशाची सुटका करून दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे गोवंश तस्करीविरोधात पोलिसांनी ठोस पाऊल उचलले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरगाव मंजू पोलीसांचे पथक परिसरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दोन इसम ग्राम धोतर्डी मार्गे बोरगाव मंजू येथे कत्तलीच्या उद्देशाने बैलांना हाकलत घेऊन जात आहेत. या खात्रीलायक माहितीच्या आधारे पोलीसांनी पंचांसह धोतर्डी रोडवरील रेल्वे बोगद्याजवळ सापळा रचला.
तेथे पाहणी केली असता दोन इसम चार बैलांना त्यांच्या मानेत लहान दोऱ्या बांधून एकत्रितपणे निर्दयतेने मारहाण करत नेत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपली नावे शेख आवेस शेख युनुस (वय २० वर्षे) आणि प्रमोद रामकृष्ण चाहाटे (वय ४२ वर्षे), दोघेही रा. मिर्झापूर, ता. जि. अकोला असल्याचे सांगितले.
चौकशीत आरोपींनी हे बैल बोरगाव मंजू येथील रहीम कुरेशी आणि सज्जू उर्फ सज्जाद कुरेशी यांच्या सांगण्यावरून कत्तलीसाठी आणत असल्याची कबुली दिली.
सदर कारवाईत चार बैलांची सुटका करण्यात आली असून त्यांची अंदाजे किंमत १ लाख ६५ हजार रुपये आहे. आरोपींनी गोवंशाला निर्दयतेने मारहाण करून त्यांना त्रास होईल अशा पद्धतीने बांधून नेल्याने त्यांच्या विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (सुधारित १९९५) व प्राणी क्रूरता प्रतिबंधक अधिनियम १९६० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून अन्य दोन आरोपींविरुद्धही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज उघडे करीत आहेत.
ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!