Join WhatsApp group

Ads

-

न्यायाधीशही असुरक्षित! अमरावतीत मध्यरात्री थरार – ५ न्यायाधीश, ४ कर्मचाऱ्यांच्या घरफोड्या

By Sarkar Maza

February 15, 2026 2:44 pm

Ads

अमरावती: दिनांक १५ : अमरावती शहरात चोरीच्या घटनांनी अक्षरशः कळस गाठला आहे. कायद्याचे रक्षक मानल्या जाणाऱ्या न्यायाधीशांच्या घरावरच चोरट्यांनी हात साफ केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

कांतानगर परिसरातील नलदमयंती आणि शहानूर अपार्टमेंटमध्ये काल मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.मिळालेल्या माहितीनुसार, पाच न्यायाधीश आणि चार न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या घरांची कुलपे तोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. विशेष म्हणजे परिसरात पोलीस बंदोबस्त असतानाही चोरांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने शिरकाव केल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे पोलिसांच्या गस्त व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.दोन दिवसांपूर्वीच अमरावतीत एका सुवर्णकाराला लुटल्याची घटना ताजी असताना आता न्यायाधीशांच्या घरफोड्यांनी शहर हादरले आहे. बाहेरगावी गेलेल्या न्यायाधीशांच्या बंद घरांना लक्ष्य करत चोरट्यांनी कुलूप तोडून चोरी केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही हालचाली दिसून आल्या असून त्यावरून तीन चोरटे असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात असून चोरट्यांचा शोध सुरू आहे.

परंतु मोठा प्रश्न असा की — न्यायाधीशच सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवायचा?

अमरावतीत वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असला तरी शहरातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!