Join WhatsApp group

Ads

---

विमान अपघात की घातपात? अजित पवार प्रकरणात मिटकरींची खळबळजनक मागणी

By Sarkarmzanews

February 7, 2026 9:43 pm

Ads

न्यूज डेस्क : दिनांक ०७ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून या प्रकरणात नवे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या अपघाताबाबत काही गंभीर शंका व्यक्त करत चौकशीचा मुद्दा अधिक तीव्र केला आहे. विमा रक्कम, पायलटची भूमिका आणि संबंधित कंपनीच्या निर्णयांवर त्यांनी थेट प्रश्न उपस्थित केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मिटकरी यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित VSR कंपनीने डिसेंबर २०२५ मध्ये आपल्या पायलट्सचा तब्बल ५० कोटी रुपयांचा विमा उतरवला होता. या निर्णयानंतर अवघ्या काही आठवड्यांत जानेवारी महिन्यात हा अपघात घडल्याने संशय निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

एवढ्या मोठ्या रकमेचा विमा अचानक का काढण्यात आला, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच हा केवळ अपघात होता की अन्य काही शक्यता आहे, याचाही तपास विविध अँगलने होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी, अशी मागणीही मिटकरी यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी सुरू केली असली तरी, या विषयावर सखोल चर्चा व्हावी यासाठी विधानसभेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी त्यांची भूमिका आहे.

मंगळवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीनंतर ते स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.या संदर्भात बोलताना मिटकरी यांनी इतिहासातील काही व्यक्तींच्या मृत्यूभोवती निर्माण झालेल्या रहस्यांचा उल्लेख करत, अजित पवार यांच्या मृत्यूबाबतही भविष्यात शंका निर्माण होऊ नयेत, असे मत व्यक्त केले. तंत्रज्ञानाच्या युगात अपूर्ण किंवा दिशाभूल करणारे अहवाल देऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्यास तो स्वीकारला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत काही पुरावे सादर करण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना, त्यांच्याकडे माहिती असल्यास ती जनतेसमोर मांडावी, असे मिटकरी म्हणाले. सुनील तटकरे यांच्यावरील टीकेबाबत भाष्य करण्याचे टाळत, या संपूर्ण प्रकरणात सत्य समोर येणे हाच मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!