Join WhatsApp group

Ads

-

ट्रॅक्टर भाड्याच्या नावाखाली ३० लाखांचा गंडा; अकोट फाईल पोलिसांनी उघड केला फसवणुकीचा मोठा रॅकेट

By Sarkarmzanews

February 5, 2026 9:08 pm

Ads

अकोला: दिनांक ०५ :

अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागात ट्रॅक्टर भाड्याने देण्याच्या आमिषातून करण्यात आलेल्या मोठ्या फसवणूक प्रकरणाचा अकोट फाईल पोलिसांनी यशस्वी छडा लावला आहे. या प्रकरणातील फरार दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एक ट्रॅक्टर जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. उर्वरित आरोपी व ट्रॅक्टरचा शोध सुरू आहे.

पोलीस स्टेशन अकोट फाईल, अकोला येथे दाखल गुन्हा क्रमांक ५७२/२५, कलम ३१६ (२), ३ (५) भारतीय न्याय संहिता अंतर्गत हा गुन्हा नोंदविण्यात आला होता. फिर्यादी गणेश श्रीराम भांडे यांच्यासह म्हातोडी, घुसर, केळीवेळी आदी गावांतील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

साखर कारखान्याच्या नावाने ट्रॅक्टर भाड्याचे आमिष

सप्टेंबर महिन्यात काही इसमांनी अकोला तालुक्यातील घुसर गावातील पेट्रोल पंप परिसरात येऊन जुन्या ओळखीच्या लोकांशी संपर्क साधला. परभणी, सोलापूर, बीड व पंढरपूर येथील साखर कारखान्यांसाठी दरमहा ४५ हजार रुपये भाड्याने ट्रॅक्टरची गरज असल्याचे सांगून त्यांनी शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टर घेतले. आर्थिक परिस्थिती सुधारेल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी आपले ट्रॅक्टर त्यांच्याकडे दिले.

३० लाख रुपयांचे सहा ट्रॅक्टर अपहारात

आरोपींनी एकूण सहा ट्रॅक्टर अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये एमएच ३० बीडब्ल्यू २४२५, एमएच ३० डीबी ८६३५, एमएच ३० बीव्ही ७०६०, क्रमांक नसलेला लाल रंगाचा स्वराज ट्रॅक्टर, स्वराज ७४२ आणि टाके कंपनीचा मुंडा १०३५ एआय ट्रॅक्टर यांचा समावेश असून, या सर्व ट्रॅक्टरची एकूण किंमत सुमारे ३० लाख रुपये आहे. आरोपींनी हे ट्रॅक्टर विकले किंवा गहाण ठेवले असल्याचा संशय आहे.

तांत्रिक तपासातून आरोपींचा माग

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या निर्देशानुसार पोलीस निरीक्षक शेख रहीम यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने तांत्रिक साधने व बौद्धिक कौशल्याचा वापर करून परभणी, बीड, पंढरपूर, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यांत तपास केला.

तपासादरम्यान बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातून संदीप उर्फ संदीपान भोकरे याला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्या पोलीस कोठडीतून इतर आरोपींची नावे समोर आली.

दुसरा आरोपी अटक, ट्रॅक्टर जप्त

यानंतर पोलिसांनी महारूद्र पांडुरंग गायकवाड, रा. तांदळा टकलेवाडी, ता. गेवराई, जि. बीड याला ताब्यात घेतले. तो पंढरपूर व तुळजापूर परिसरात ठिकाणे बदलत राहत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याने गुन्ह्याची कबुली देत तांदळा टकलेवाडी येथील शेतात ट्रॅक्टर लपवून ठेवल्याची माहिती दिली. त्यानुसार फिर्यादींच्या मित्राचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर जप्त करण्यात आला असून आरोपीस चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.

पुढील तपास सुरू

सध्या उर्वरित आरोपी व ट्रॅक्टरचा शोध घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक गजानन खंडारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रशांत उज्जैनकर व पोलीस शिपाई निलेश बोरकुटे यांचे पथक पंढरपूर, परभणी व सोलापूर परिसरात तपास करत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बदेली रेड्डी व उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून अकोट फाईल पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!