Join WhatsApp group

Ads

-

प्रसिद्धीला प्राधान्य, समाजाला दुय्यम — नगरसेवकपदाचा घसरता स्तर

By Sarkarmzanews

January 19, 2026 10:47 pm

Ads

“इथे कचरा उचलला”, “नळ एवढ्या वाजता येणार”, “दिवा दुरुस्त झाला”—अशा सूचना आज काही नगरसेवक अभिमानाने सोशल मीडियावर टाकताना दिसतात.

पण एक साधा प्रश्न आहे :

हे काम नगरसेवकांचे आहे की नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे?

कचरा उचलणे, पाणीपुरवठा करणे, दिवे लावणे ही कामे नगरपरिषदेचे कर्मचारी पगार घेऊन करतात. नगरसेवकांनी या कामांची सूचना फलक बनणे म्हणजे लोकप्रतिनिधित्व आहे का?

आजची स्थिती अशी आहे की नगरसेवकांचे काम समाजसेवा नसून अपडेट देणे इतक्यावर येऊन थांबले आहे. आणि या अपडेटवरून वर्तमानपत्रात फोटो, अभिनंदन आणि प्रसिद्धी मिळवली जाते. मग प्रश्न पडतो—जर नगरसेवक फक्त कचरा आणि नळाचे वेळापत्रक सांगणार असेल, तर समाजाच्या मोठ्या प्रश्नांवर कोण बोलणार?

शहरात भ्रष्टाचार बोकाळला आहे. अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत. नियमबाह्य बांधकामे प्रशासनाच्या आशीर्वादाने उभी राहत आहेत. तरुणाई व्यसनाधीन होत आहे. गरीबांचे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर आहे. पण या विषयांवर बहुतांश नगरसेवकांची भूमिका शून्य आहे. कारण या प्रश्नांवर बोलले तर प्रशासन नाराज होईल, राजकीय अडचण येईल—आणि ती जोखीम घ्यायची तयारी कुणाचीच नाही.

याहूनही गंभीर बाब म्हणजे, काही नगरसेवक स्वतःच अवैध धंद्यांशी थेट किंवा अप्रत्यक्ष जोडलेले असल्याची शहरात उघड चर्चा आहे. निवडणुकीपूर्वी किंवा दबावामुळे बंद झालेले अवैध धंदे पुन्हा सुरू व्हावेत म्हणून हेच नगरसेवक प्रशासनाच्या दारात चकरा मारताना दिसतात.

प्रश्न असा आहे—जे स्वतः नियम मोडतात, ते समाजाला न्याय कसा देणार?

नगरसेवक हे भ्रष्टाचाराविरुद्ध उभे राहणारे असायला हवेत, पण काही ठिकाणी तेच भ्रष्ट यंत्रणेचे भाग बनले आहेत.

तक्रारदारांना न्याय देण्याऐवजी त्यांना दम देणे, प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना दुर्लक्षित करणे आणि अवैध धंद्यांकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करणे—हीच आजची “कार्यक्षमता” मानली जात आहे.

समाजसेवा म्हणजे बॅनर, हार, फोटो आणि मेसेज नव्हेत. समाजसेवा म्हणजे अन्यायाविरुद्ध उभे राहणे, अवैध धंद्यांना विरोध करणे, भ्रष्ट प्रशासनाला जाब विचारणे आणि सामान्य माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे. पण आज अनेक नगरसेवकांसाठी समाजसेवा ही केवळ निवडणुकीपुरती संज्ञा उरली आहे.

नगरसेवकपद हे सत्तेचा वापर स्वतःच्या हितासाठी करण्यासाठी नसून, समाजाच्या हितासाठी लढण्यासाठी आहे. जर नगरसेवक कचरा उचलल्याची पोस्ट टाकण्यातच व्यस्त असेल, आणि त्याच वेळी शहरात अवैध धंदे फोफावत असतील, तर अशा लोकप्रतिनिधींवर जनता विश्वास कसा ठेवणार?

आज जनतेला नोटीस बोर्ड नव्हेत, तर निर्भीड, प्रामाणिक आणि धाडसी नगरसेवक हवे आहेत.

अन्यथा उद्या जनता एकच प्रश्न विचारेल—तुम्ही नगरसेवक होता, की फक्त नगरपरिषदेचे मेसेज फॉरवर्डर?

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!