Join WhatsApp group

Ads

--

हेच का महिला सक्षमीकरण? शहरात स्वच्छतागृहच नाही! तरुणी व महिलांचा रोजचा संघर्ष

By Sarkarmzanews

January 17, 2026 5:38 pm

Ads

मुर्तिजापूर : दिनांक १७ : मुर्तिजापूर शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव हा आता केवळ प्रशासकीय निष्काळजीपणाचा विषय राहिलेला नाही, तर तो थेट तरुणी व महिलांच्या सन्मान, सुरक्षितता आणि आरोग्यावर घाला घालणारा गंभीर सामाजिक प्रश्न बनला आहे. विकासाच्या नावाखाली शहर पुढे जात असल्याचे चित्र रंगवले जाते, पण प्रत्यक्षात महिलांना मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागते, ही वस्तुस्थिती चिंताजनक आहे.

दररोज ग्रामीण विभागातून शेकडो तरुणी कॉलेज, शाळा व उच्च शिक्षणासाठी मुर्तिजापूर शहरात येतात. त्याचप्रमाणे अनेक महिला वर्ग रोजगार, व्यवसाय, शासकीय व खासगी कामानिमित्त शहरात ये-जा करतात. मात्र शहरात प्रवेश करताच त्यांना सर्वात आधी जाणवते ती म्हणजे सुरक्षित व स्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहांची अनुपस्थिती.

सर्वाधिक वर्दळीच्या रेल्वे स्टेशन परिसरात संपूर्ण परिसरासाठी केवळ एकच स्वच्छतागृह असून तेही सध्या बंद अवस्थेत आहे. या स्वच्छतागृहात ना बोरिंग आहे, ना पिण्याच्या व वापराच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था. हजारो प्रवासी रोज येथे येतात, मात्र तरुणी व महिलांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध नसणे म्हणजे प्रशासनाच्या संवेदनशून्यतेचे प्रतीक आहे.

या परिस्थितीचा सर्वाधिक त्रास तरुणी व महिलांनाच सहन करावा लागतो. असुरक्षित वातावरण, उघड्यावर जाण्याची भीती, मानसिक ताण, तसेच आरोग्याशी तडजोड — हे सगळे त्यांचे रोजचे वास्तव बनले आहे. अनेक तरुणी लघवी रोखून धरतात, पाणी कमी पितात; परिणामी मूत्रमार्ग संसर्ग, पोटाचे विकार व इतर गंभीर आरोग्य समस्याचा धोखा निर्माण होत आहेत. हा प्रश्न केवळ स्वच्छतेचा नसून महिला आरोग्य व सन्मानाचा आहे.

नगरपरिषद प्रशासनाने उभारलेल्या व्यापारी संकुलांमध्येही महिलांसाठी स्वच्छतागृहांची सोय नसणे हे अधिक गंभीर आहे. ग्रामीण भागातून आलेल्या तरुणी व महिलांना शहरात सुरक्षित सुविधा मिळणार नसतील, तर शिक्षण, रोजगार आणि स्वावलंबनाच्या संधींचे काय?

‘स्वच्छ भारत अभियान’, ‘महिला सक्षमीकरण’, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ यासारख्या घोषणा शहरभर झळकत असताना प्रत्यक्षात तरुणी व महिलांच्या गरजांकडे डोळेझाक केली जात असल्याचा आरोप होत आहे. घोषणांपेक्षा वास्तव अधिक बोलके आहे.

आता हा प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाही. नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ रेल्वे स्टेशन परिसरासह शहरातील सर्व सार्वजनिक ठिकाणी तरुणी व महिलांसाठी स्वतंत्र, सुरक्षित, स्वच्छ व पाण्याची व्यवस्था असलेली स्वच्छतागृहे कार्यान्वित करणे आवश्यक आहे. ही सुविधा देणे म्हणजे उपकार नव्हे, तर प्रशासनाची मूलभूत जबाबदारी आहे.

जोपर्यंत ग्रामीण भागातून येणाऱ्या तरुणी व महिलांना शहरात सन्मानाने व सुरक्षितपणे वावरता येत नाही, तोपर्यंत कोणताही विकास पूर्ण मानता येणार नाही. कारण शहराचा खरा विकास हा महिलांच्या सुरक्षिततेतून आणि सन्मानातूनच मोजला जातो.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!