Join WhatsApp group

Ads

“जिथे देव नसेल तिथे – “समाजसेवेचा खरा अर्थ सांगणारा सेनापती”

By Sarkarmzanews

January 16, 2026 11:29 am

Ads

आजच्या काळात माणूस प्रगती करतो आहे, तंत्रज्ञान पुढे जात आहे, शहरं झगमगतात आहेत; पण त्याच वेळी माणुसकी हरवत चालली आहे, अशी भावना अनेकांच्या मनात दाटून येते. स्वार्थ, स्पर्धा, राजकारण आणि प्रसिद्धीच्या झगमगाटात खरी समाजसेवा दुर्मिळ होत चालली आहे. अशा काळात मुर्तिजापूर शहरात एक सामान्य युवक. आहे.

तो नाव म्हणजे सेनापती जो रोजच्या कृतीतून माणुसकी जिवंत ठेवतो.

सेनापतीची कहाणी कुठल्याही राजकीय व्यासपीठावरून सांगितली जात नाही, कुठल्या पोस्टरवर झळकत नाही.

ही कहाणी रुग्णवाहिकेच्या सायरनमध्ये, अपघातस्थळी सांडलेल्या रक्तात, शासकीय रुग्णालयाच्या ओपीडीत उभ्या असलेल्या अश्रूंमध्ये आणि स्मशानभूमीत पेटणाऱ्या चितांमध्ये लिहिली गेली आहे.

उदरनिर्वाहातून उदात्त समाजसेवेपर्यंतचा प्रवास

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत २०१३ साली सेनापती रुग्णवाहिकेवर चालक म्हणून पहिल्यांदा कामाला लागला. पोटाची भूक भागवण्यासाठी सुरू केलेलं काम, हळूहळू त्याचं आयुष्य बनलं. रुग्णवाहिकेचा स्टेअरिंग हातात घेताना त्याने केवळ रुग्णवाहिका चालवली नाही, तर अनेक जिवांना जीवनाकडे परत नेलं. चालक ते रुग्णसेवक हा त्याचा प्रवास केवळ पदाचा नाही, तर मनाचा आहे.

तालुक्यात कुठेही अपघात झाला की दिवस असो वा रात्र, पाऊस असो वा थंडी—सेनापती सर्वात आधी तिथे पोहोचतो. वेळेत दवाखान्यात पोहोचणं म्हणजे जीव वाचणं, हे तो जाणतो. म्हणूनच त्याच्यासाठी स्वतःची झोप, भूक, आरोग्य कधीच महत्त्वाचं ठरत नाही. त्याची आई सांगते—अनेकदा जेवणाचं ताट तसंच सोडून तो अपघातस्थळी धाव घेतो. ही केवळ जबाबदारी नाही; ही माणुसकी आहे.

रुग्णालयात माणूस म्हणून उभा राहणारा माणूस

मुर्तिजापूर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांसाठी सेनापती देवदूतासारखा आहे. कुणाला कुठे जायचं, कोणता कागद लागतो, कोणत्या विभागात उपचार होतात—हे तो सांगतो. पण एवढ्यावरच तो थांबत नाही. पैसे नसतील, औषध परवडत नसेल, रक्ताची गरज असेल—तर सेनापती त्या रुग्णासाठी राजा बनून उभा राहतो.

अनेकांसाठी तो केवळ मदत करणारा नाही, तर आधार देणारा माणूस आहे. संकटात माणूस बोलतो ते शब्द नाही, तर त्याला मिळणारी साथ महत्त्वाची असते. आणि ती साथ सेनापती निःशब्दपणे देतो.

एका मरणासन्न माणसाच्या शब्दांनी आयुष्य बदललं

या सेवाभावाच्या प्रवासात एक प्रसंग सेनापतीच्या मनात कायमचा कोरला गेला. एकदा रुग्णवाहिकेत नेत असताना, मृत्यूशी झुंज देणाऱ्या एका मरणासन्न माणसाने त्याचा हात घट्ट पकडला आणि म्हणाला—

“बाळा… माझं या जगात कुणीच नाही. मेलो तर… माझं शेवटचं कोण करणार?”

हे शब्द त्या माणसाचे शेवटचे असावेत, पण सेनापतीसाठी ते आयुष्यभराचे झाले. त्या क्षणी त्याने ठरवलं—

“ज्याचं कोणी नाही, त्याचा मी तरी माणूस होईन.”

बेवारसांचा वाली, माणुसकीचा रखवालदार

त्या दिवसापासून सेनापतीने बेवारस मृतदेहांचे अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली. आजपर्यंत असंख्य अनोळखी माणसांना त्याने शेवटचा मान दिला आहे. कोणताही धर्म, जात, ओळख न पाहता—फक्त माणूस म्हणून.

स्मशानभूमीत उभा राहून कुणाचा तरी शेवटचा विधी करणं हे सोपं काम नाही. त्यासाठी ताकद लागते, मनाचा कणखरपणा लागतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे करुणा लागते.

सेनापतीकडे ही सगळी संपत्ती आहे—पैशाच्या नव्हे, माणुसकीच्या रूपात.

प्रसिद्धीशिवायची समाजसेवा

आज समाजसेवा अनेकदा पोस्टर, बॅनर, फोटो आणि लाईक्सपुरती मर्यादित राहिली आहे. निवडणूक आली की अनेक “समाजसेवक” दिसतात.पण सेनापती कुठेच दिसत नाही—

कारण तो काम करत असतो. ना राजकारणाची अपेक्षा, ना पदाची, ना पैशाची, ना कुठलीही लालसा. त्याची समाजसेवा ही जाहिरातीसाठी नाही, तर आंतरिक आत्मशांतीसाठी आहे.

सेनापती एक माणूस नाही, तो एक विचार आहे. तो सांगतो की समाज बदलण्यासाठी मोठं पद लागत नाही, मोठा पैसा लागत नाही—फक्त मोठं मन लागतं.

माणुसकी ही शिकवली जात नाही, ती जगली जाते. आणि सेनापती ती रोज जगतो.अशा या निःस्वार्थ, निस्सीम समाजसेवकाला सरकार माझा न्यूजचा मनापासून सलाम.

मुर्तिजापूरचा सेनापती म्हणजे माणुसकीचा सेनापती आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!