Join WhatsApp group

Ads

आज खेळणं, उद्या अपेक्षा : पालकत्वाची कठीण परीक्षा

By Sarkarmzanews

January 11, 2026 7:36 pm

Ads

रविवार… कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा दिवस. मॉल, चित्रपटगृह, फूडकोर्ट याठिकाणी गर्दी असते. अशाच एका मॉलमध्ये चार वर्षांचा मुलगा ३००० रुपयांच्या खेळण्यासाठी जमिनीवर लोळण घेत, हात-पाय आपटत, किंचाळत होता. काही क्षणांतच तो एक खासगी कौटुंबिक प्रसंग न राहता सार्वजनिक तमाशा झाला.

मुलाच्या वडिलांचा चेहरा घामाने ओलाचिंब झाला होता. मुलाच्या वेदनेपेक्षा त्यांना अधिक छळत होती ती भावना — “आजूबाजूचे लोक काय म्हणतील?”

त्या अस्वस्थ शांततेत अखेर खिशातून कार्ड बाहेर आलं. खेळणं विकत घेतलं गेलं. मुलगा शांत झाला. आई-वडिलांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

प्रसंग संपल्यासारखा वाटतो.

पण खरं तर… तो इथेच सुरू होतो.

मूल हट्टी नसतं, हट्टी बनवलं जातं

बालरोगतज्ज्ञ आणि बालमानसशास्त्रज्ञ एकमुखाने सांगतात — कोणतंही मूल जन्मतः हट्टी नसतं. हट्टीपणा ही सवय आहे आणि सवयी घडवल्या जातात. यामागे असतो पालकांचा प्रतिसाद. मानसशास्त्रीय भाषेत याला कंडिशनिंग म्हणतात.

मुलाचं निरीक्षण अचूक असतं.

ते शिकतं — हळू रडलो तर दुर्लक्ष होतं.

थोडा हट्ट केला तर ओरड मिळतं.

पण जर मोठ्याने किंचाळलो, लोकांचं लक्ष वेधलं, तर मागणी पूर्ण होते.

याच प्रक्रियेत मूल शिकतं की नियम पाळण्यापेक्षा नियम मोडणं फायदेशीर आहे.

आज खेळणं… उद्या आज

हा हट्ट खेळण्यापुरता आहे. पण उद्या तो मोठा होईल.

तेव्हा जमिनीवर लोळण नसेल.

तेव्हा असे शब्द असतील — “मला हीच गाडी पाहिजे.”

“हेच शिक्षण हवं.”

“हेच आयुष्य मला जगायचं आहे.”आणि

आणि पालकांसमोर उभं राहतं एक नवं संकट — भावनिक दबाव.

कारण त्याला कधीच “नाही” स्वीकारायला शिकवलं गेलंच नाही.

समाज बदलतोय, पालकत्वही… पण योग्य दिशेने?

आजची पिढी पालक म्हणून अधिक प्रेमळ आहे, अधिक संवेदनशील आहे. मात्र अनेकदा या प्रेमात शिस्त हरवते. प्रेम आणि लाड यांची सीमारेषा अस्पष्ट होते. मूल रडू नये, त्रास होऊ नये, आपल्याला दोष येऊ नये — या भावनेत पालक स्वतःच माघार घेतात.

पण तज्ज्ञ सांगतात, शिस्त म्हणजे शिक्षा नव्हे; शिस्त म्हणजे स्पष्टता.

पालकांसाठी तीन मूलभूत मार्गदर्शक तत्त्वं — पहिलं ठाम निर्णय.

एकदा ‘नाही’ म्हटलं, की तो निर्णय बदलू नये.

निर्णय बदलला की पालकत्वाची विश्वासार्हता संपते.

दुसरं — शांत दुर्लक्ष.

विनाकारण हट्टीपणा दुर्लक्षित करणं ही कठोरता नाही, ती उपचारपद्धत आहे.हट्टीपणाला प्रेक्षक न मिळाल्यास तो कमी होतो.

तिसरं — शांततेसाठी लाच देऊ नये.“रडला नाहीस तर…” ही वाक्यं तात्पुरती सोय असली, तरी दीर्घकालीन नुकसान करतात.

कठोर आज, सुरक्षित उद्यापालकांसाठी

हा संघर्ष सोपा नाही. आज मूल रडताना पाहणं वेदनादायक असतं. पण तज्ज्ञ सांगतात — आजचे काही अश्रू सहन केले, तर उद्याचं आयुष्य सुसंस्कृत होऊ शकतं.

कणखर, समतोल आणि जबाबदार व्यक्तिमत्त्व घडवायचं असेल, तर पालकांनाही कधी कधी दगडासारखं कठोर व्हावं लागतं.

मॉलमधला तो प्रसंग केवळ एका कुटुंबाचा नव्हता.

तो आजच्या पालकत्वाचा आरसा होता.

—डॉ. सुजित भरत पाटील बालरोगतज्ज्ञ, पुणे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!