Join WhatsApp group

Ads

---

सरपंचा खुर्चीवर फेकले गटार , सरपंचाने गावाचा मलिदा खाल्ला गावकर्यांचे आरोप. ग्रामसचिवा वर सुद्धा संशयाची सुई?

By Sarkarmzanews

December 26, 2025 7:20 pm

Ads

मुर्तीजापुर : दिनांक २६ : हातगाव ग्रामपंचायतीतील कचरा व्यवस्थापनाचा भोंगळ, बेजबाबदार व संशयास्पद कारभार ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत चव्हाट्यावर आला आहे. सभेत ग्रामपंचायत सदस्य अक्षय जोगळे यांनी ग्रामपंचायतची कचरा गाडी नेमकी कुठे आहे, असा थेट सवाल उपस्थित केला. मात्र या प्रश्नावर कोणतेही ठोस उत्तर न देता अचानक सभा बरखास्त करण्यात आल्याने संशय अधिक गडद झाला आहे.


ग्रामपंचायतकडे दोन कचरा गाड्या असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यापैकी एक गाडी अनेक महिन्यांपासून गावात दिसत नसल्याचा आरोप होत आहे. ही गाडी चोरीला गेली असल्यास पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे का? असा सवालही सभेत उपस्थित करण्यात आला. मात्र यावर कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.


दरम्यान, ग्रामसचिवांच्या म्हणण्यानुसार संबंधित कचरा गाडी मेन्टेनन्ससाठी (दुरुस्तीसाठी) बाहेर पाठवण्यात आली आहे. मात्र ती गाडी नेमकी कोणत्या गॅरेजमध्ये आहे, याची माहिती देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे ग्रामसभा सुरू असतानाच सरपंचांनी कुणाला तरी फोन करून “गाडी परत आणून द्या” असे सांगितल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.


या प्रकरणावर सरपंचांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी स्पष्ट केले की, कचरा गाडीच्या मेन्टेनन्सचे टेंडर ठेकेदार रजा घाणीवाले यांच्याकडे आहे आणि याबाबत अधिक माहिती हवी असल्यास त्यांच्याशीच विचारपूस करा, असे सरपंचांनी सांगितले. मात्र प्रसार माध्यमांनी रजा घाणीवाले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या दाव्यांवर आणि मेंटेनन्सच्या कामावर अधिकच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


ग्रामस्थ व काही ग्रामपंचायत सदस्यांकडून आता थेट प्रश्न उपस्थित केले जात आहेत की—
कचरा गाडी गावात नेमकी किती दिवसांत परत येणार आहे?
तोपर्यंत गावातील कचऱ्याचे नियोजन कोण आणि कसे करणार?
लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या कचरा डेपोचा प्रत्यक्ष उपयोग कधी होणार आहे?


या संदर्भात एका ग्रामपंचायत सभासदाने सांगितले की, सदर कचरा गाडी १५व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीला मिळाली आहे. मात्र ती गाडी नवीन खरेदी करण्यात आली की जुनी गाडी खरेदी करण्यात आली, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. सार्वजनिक निधीचा योग्य वापर झाला की नाही, हा देखील गंभीर प्रश्न आहे.


प्रसार माध्यमांनी पाहणी केली असता असे निदर्शनास आले की ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या कचरा डेपोवर आजपर्यंत कचऱ्याची एकही खेप टाकण्यात आलेली नाही. ओला व सुका कचरा वेगळा करण्याची व्यवस्था कागदावरच मर्यादित असल्याचे दिसून येते.


प्रत्यक्षात मात्र गावातील एका भागात घरासमोरच कचरा टाकला जात असून, याच ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा हॅण्डपम्प आहे. कचऱ्यामुळे पाण्याचे प्रदूषण होण्याचा धोका निर्माण झाला असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. या भागात डासांचा मोठ्या प्रमाणावर वावर असून डेंग्यूसदृश आजारांचा धोका वाढल्याचे ग्रामस्थ सांगतात.
गावातील कचरा व्यवस्थापनाची ही एकूणच परिस्थिती पाहता, कचरा व्यवस्थापन व मेंटेनन्सचे अक्षरश १२ वाजले आहे. ग्रामपंचायतच्या कार्यक्षमतेवर आणि प्रत्यक्ष कामावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. स्वच्छता फक्त कागदावरच आहे अशी सत्यता हातगाव मध्ये दिसते. या मुळे लहान मुलांचे आरोग्य सुद्धा धोक्यात आले आहे, अनेक लहान मुले डेंगू आजाराने ग्रसित झाली असून शौचलायचा नाल्यामध्ये पडतात.


या परिस्थितीविरोधात गावातील महिलांचा संताप उफाळून आला. काही महिलांनी गावातील कचरा उचलून थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठले आणि तोच कचरा सरपंचांच्या खुर्चीवर तसेच ग्रामसचिवांच्या टेबलवर टाकून तीव्र निषेध नोंदवला. मात्र यावर ग्रामसचिवांनी कोणतेही उत्तर दिले नाही, तर सरपंचांनी पुढील प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.


लाखो रुपये खर्च करून आणलेल्या कचरा गाड्या प्रत्यक्षात १०० मीटरही चाललेल्या नसल्याचे चित्र असून, एक गाडी ग्रामपंचायती समोरच तोडक्या अवस्थेत उभी आहे, व गाडीची अवस्था बघता आज पर्यंत कधी चालली नाही, तर दुसरी गाडी नेमकी कुठे आहे, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी, कचरा गाडी कधी परत येणार याची ठोस वेळमर्यादा, मेंटेनन्स टेंडरचा तपशील, कचरा व्यवस्थापनाचा स्पष्ट आराखडा आणि १५व्या वित्त आयोगातील निधीच्या खर्चाचा हिशेब जाहीर करण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.

गावकऱ्यांचा अनुसार जेव्हापर्यंत आमचा घरा समोरील कचरा व्यवस्थापन सुरळीत होत नाही तेव्हा पर्यंत रोज असाच कचरा सरपंच व ग्रामं अधिकारी यांचा खुर्चीवर दिसेल.

आता प्रश्न असा उरतो कि सरपंच आता तरी गावकऱ्यांचा व लहान मुलांचा आरोग्याची काळजी घेऊन कचरा व्यवस्थापन करणार का ?

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!