Join WhatsApp group

Ads

कुस्तीपटू अश्विनी पौळ यांच्यासह दोन मुलांचा मृत्यू; नळदुर्ग किल्ल्यावरील घटनेचा तपास सुरू

By Sarkarmzanews

September 4, 2026 3:00 pm

Ads

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावर घडलेल्या हृदयद्रावक घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्या कुस्तीपटू अश्विनी मनोहर पौळ यांनी आपल्या तीन मुलांसह किल्ल्याच्या बुरुजावरून उडी घेतल्याची घटना घडली. या दुर्घटनेत अश्विनी पौळ यांच्यासह त्यांच्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, एक मुलगी गंभीर जखमी आहे. तिच्यावर धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मृतांमध्ये अश्विनी पौळ, त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य आणि अडीच वर्षांची जुळी मुलगी क्रांती यांचा समावेश आहे. तर दुसरी जुळी मुलगी वीरा गंभीर जखमी झाली आहे.

‘महाराष्ट्राची वाघीण’ काळाच्या पडद्याआड

अश्विनी पौळ यांची कुस्ती क्षेत्रात वेगळी ओळख होती. ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अश्विनी यांनी राष्ट्रीय स्तरावरील विविध कुस्ती स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यांनी ५ सुवर्ण आणि ६ रौप्य पदकांची कमाई केल्याची माहिती आहे. त्या मुंबईतील महाराष्ट्र सुरक्षा दलातही कार्यरत होत्या. मात्र, काही महिन्यांपूर्वी त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला होता आणि त्या मुलांसह माहेरी राहत असल्याचे सांगण्यात येते.

कौटुंबिक छळाचा वडिलांचा गंभीर आरोप

या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, अश्विनी यांच्या वडिलांनी त्यांच्या पतीसह सासरच्या मंडळींकडून मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. याच त्रासाला कंटाळून अश्विनी यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा नातेवाईकांकडून करण्यात आला आहे.मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसून, पोलिस तपासातूनच या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

पोलिस तपासातून सत्य समोर येणार

घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून, कौटुंबिक परिस्थिती, अश्विनी यांचे वैयक्तिक जीवन, नोकरीचा राजीनामा तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी केलेले आरोप या सर्व बाबींची चौकशी केली जात आहे. घटनेपूर्वी अश्विनी यांच्या संपर्कात कोण होते, त्यांची मानसिक अवस्था काय होती आणि या टोकाच्या निर्णयामागे नेमकी कोणती परिस्थिती निर्माण झाली होती, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.एका कर्तृत्ववान महिला कुस्तीपटूचा आपल्या तीन चिमुकल्या मुलांसह झालेला हा दुर्दैवी अंत क्रीडा क्षेत्रासाठीही मोठा धक्का मानला जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संपूर्ण सत्य समोर आणावे, अशी मागणी होत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!