Join WhatsApp group

Ads

-

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजनांसाठी महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By Sarkarmzanews

September 23, 2026 7:37 am

Ads

केंद्राच्या मदतीची वाट न पाहता शेतकऱ्यांना मदत करणार; मंत्री, विविध यंत्रणा बांधावर जाणार येत्या शनिवारपर्यंत दुष्काळासंदर्भात प्राथमिक अधिसूचना काढणार

मुंबई : राज्यातील काही भागांतील दुष्काळसदृश्य परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात येत आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता राज्य शासनाकडून मदत केली जाईल. तसेच, दुष्काळासंदर्भात येत्या शनिवारपर्यंत प्राथमिक अधिसूचना जारी केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्य मंत्रिमंडळाची मंत्रालयात बैठक झाली. बैठकीत राज्यातील पावसाचे प्रमाण, धरणांमधील पाणीसाठा आणि शेतीच्या परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा झाली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील दुष्काळासंदर्भातील प्राथमिक माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.

या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी गतीने निर्णय घेता यावा, यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीला मंत्रिमंडळाचेच अधिकार असतील.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली या समितीमध्ये जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील आदी मंत्र्यांचा समावेश आहे. मुख्य सचिव राजेश अग्रवाल हे या समितीचे सदस्य सचिव असतील.

राज्यभरातून येणाऱ्या माहितीच्या आधारे कोणत्या भागात दुष्काळी परिस्थिती आहे आणि तेथे कोणती मदत व उपाययोजना करायची, याबाबत ही समिती निर्णय घेईल. उद्यापासून राज्यातील दुष्काळसदृश्य भागात पंचनामे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सोयाबीन, मका, कापूस आदी पिकांना सर्वाधिक फटका बसला असून, कोकणातील भातशेतीवरही दुष्काळाचा विपरीत परिणाम झाला आहे. राज्यातील दुष्काळसदृश्य भागांची उद्यापासून स्वतः पाहणी करणार असून, मंत्री आणि लोकप्रतिनिधींनाही बांधावर जाऊन पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शेतकऱ्यांना मदतीसाठी एनडीआरएफच्या निकषांनुसार केंद्र सरकारकडे मदतीबाबतचा प्रस्ताव पाठवणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी चारा यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. आगामी सात ते आठ महिन्यांचे नियोजन केले जाणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयातून हे नियोजन केले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Related Article

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजनांसाठी महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पत्नी, मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा

मूर्तिजापूर मध्ये शांतता समितीचा बैठकीला नागरिकांचे व गणेश मंडळाचे ऊस्फूर्त प्रतिसाद

अकोला शहराची बाजारपेठ झोपडपट्टी दादाने हादरली; व्यापाऱ्यांचे निवेदन, मात्र पोलिसांची कारवाई कुठे?

जुगाराचे क्लब बंद झाले; आता माना गावातील ‘दारू अड्ड्यां’वर कारवाई कधी? आमदारांच्या निर्देशानंतर प्रशासनाची परीक्षा!

जिल्हास्तरीय शालेय रग्बी स्पर्धेत विविध वयोगटांत चुरशीच्या लढती

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!