Join WhatsApp group

Ads

मुर्तिजापूरमध्ये अतिक्रमण नियमितीकरण मोहिमेला वेग

By Sarkar Maza

May 7, 2026 3:34 pm

Ads

२०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे अटींवर नियमित होणार; प्रशासनाकडून मोठा दिलासा

मुर्तिजापूर : मुर्तिजापूर तालुक्यातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या निवासी अतिक्रमणांच्या प्रश्नावर प्रशासनाने आता ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. १ जानेवारी २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे शासनाच्या अटी व नियमांनुसार नियमित करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून, पात्र नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. हरीष मारोती (आप्पा) पिंपळे यांनी दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी आयोजित विधानसभा क्षेत्रीय समितीच्या बैठकीत अतिक्रमण नियमितीकरण प्रक्रियेला तात्काळ गती देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते.

त्यानंतर मा. जिल्हाधिकारी वर्षा मिना व उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांच्या मार्गदर्शनाखाली शासन निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात विशेष मोहिम राबविण्यात येत असून अर्ज स्वीकारणे, कागदपत्रांची पडताळणी, हरकतींवरील सुनावणी तसेच भूमी अभिलेख विभागामार्फत मोजणी करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, नियमबद्ध व वेळबद्ध पद्धतीने पार पडणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार नदीपात्र, गायरान, सीआरझेड क्षेत्र तसेच सार्वजनिक उपयोगाच्या जागांवरील अतिक्रमणे नियमित होणार नसून अशा प्रकरणांवर निष्कासनाची कारवाई केली जाणार आहे.

पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह आपल्या ग्रामपंचायतीकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी केले आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२६ ठेवण्यात आली आहे.

कोणती अतिक्रमणे ठरणार पात्र?

१ जानेवारी २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे पात्र ठरणार

५०० चौरस फुटांपर्यंतचे अतिक्रमण विनामूल्य नियमित

१५०० चौरस फुटांपर्यंत अतिरिक्त क्षेत्रावर १० टक्के शुल्क आकारले जाणार

लाभार्थ्यांना भोगवटादार वर्ग-२ दर्जा प्रदान केला जाणार

नियमितीनंतर ५ वर्षे विक्री व हस्तांतरणास बंदी राहणार

मतदार यादी, वीज बिल, मालमत्ता कर पावती किंवा इतर शासकीय नोंदींपैकी किमान एक पुरावा आवश्यक

सध्याच्या वास्तव्या संदर्भातील शासकीय पुरावा अनिवार्य राहणार

या मोहिमेमुळे तालुक्यातील हजारो नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!