Join WhatsApp group

Ads

----

सापांपासून नाही, अज्ञानापासून वाचवणारा सर्प मित्र म्हणजे – मुन्ना श्रीवास

By Sarkarmzanews

January 10, 2026 7:49 pm

Ads

मुर्तिजापूर : आजही साप म्हटले की भीती, घबराट आणि अंधश्रद्धा डोळ्यासमोर उभी राहते. मात्र मूर्तिजापूर तालुक्यात एक नाव असे आहे, जे या भीतीला माणुसकीची, विज्ञानाची आणि संवेदनशीलतेची जोड देते.

ते नाव म्हणजे सर्पमित्र मुन्ना श्रीवास.

मूर्तिजापूर तालुक्यात कुठेही घरात, शेतात, शाळेत किंवा सार्वजनिक ठिकाणी सर्प आढळल्याची माहिती मिळताच, दिवस असो वा रात्र, पावसाळा असो वा कडाक्याची उन्हाळी दुपार – मुन्ना श्रीवास एका हाकेवर तात्काळ घटनास्थळी पोहोचतात.

विशेष म्हणजे ही संपूर्ण सेवा मागील पंधरा वर्षांपासून अविरत ते मोफत देत आहे. कोणताही मोबदला न घेता ते सर्पाचे रक्षण करतात आणि त्याच वेळी समाजालाही संभाव्य धोक्यापासून वाचवतात.

साप हा निसर्गातील महत्त्वाचा घटक आहे. उंदीर नियंत्रणापासून पर्यावरणीय समतोल राखण्यापर्यंत त्याची भूमिका मोठी आहे. मात्र अज्ञान आणि भीतीमुळे सर्पांना मारले जाते.

अशा वेळी मुन्ना श्रीवास केवळ सर्प पकडत नाहीत, तर लोकांना समजावून सांगतात—साप शत्रू नसून निसर्गाचा मित्र आहे. ही जनजागृतीच त्यांची खरी समाजसेवा ठरते.

आज अनेकदा बातम्यांत सर्पदंशाच्या घटना वाचायला मिळतात. अशा पार्श्वभूमीवर योग्य पद्धतीने, सुरक्षित साधनांनी आणि प्रशिक्षणाच्या आधारे सर्पांना पकडून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडणे ही तितकीच महत्त्वाची जबाबदारी आहे.

मुन्ना श्रीवासही जबाबदारी वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे निभावत आहेत.

या सेवेमध्ये धोका आहे, थकवा आहे, कधी कधी अपमानही आहे; पण तरीही “कोणाचाही जीव वाचला पाहिजे—माणसाचाही आणि सर्पाचाही” हा विचार त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू आहे.

अशा माणसांमुळेच समाजात माणुसकी जिवंत आहे, असे म्हणावे लागेल. आज गरज आहे ती अशा सर्पमित्रांना केवळ कौतुकाच्या शब्दांपुरते मर्यादित न ठेवता, प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि समाजाने त्यांना पाठबळ देण्याची.

कारण सर्पमित्र मुन्ना श्रीवास हे फक्त सर्प पकडणारे नाहीत, तर ते निसर्ग आणि समाज यांच्यातील विश्वासाचा सेतू आहेत.

अशा सर्पमित्र मुन्ना श्रीवास यांना सरकार माझा न्यूजचा सलाम.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!