Join WhatsApp group

Ads

-

रस्त्यांचा गाजावाजा मोठा; शेतकऱ्यांच्या नशिबी मात्र चिखलमय पाणंद वाटा

By Sarkar Maza

July 10, 2026 10:08 am

Ads

मंगरूळ कांबे–शेलू पाणंद रस्त्याची दुरवस्था; खरीप हंगामातील शेतीकामे खोळंबली

मूर्तिजापूर तालुक्यातील मंगरूळ कांबे–शेलू या प्रमुख पाणंद रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच हा मार्ग चिखलमय बनला आहे. जागोजागी पाणी साचल्याने शेतकऱ्यांना शेतात जाणेही अवघड झाले आहे.

परिणामी खरीप हंगामातील पेरणी, मशागत, कोळपणी तसेच बियाणे, खते आणि इतर शेतीसाहित्य शेतापर्यंत पोहोचविण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.

शासनाकडून पाणंद रस्त्यांच्या विकासासाठी आणि खडीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होत असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्ष परिस्थिती पाहता हा निधी नेमका कुठे खर्च झाला, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. प्रशासनाच्या अनास्थेमुळे ग्रामीण भागातील पाणंद रस्त्यांची दुरवस्था कायम असल्याचा आरोपही होत आहे.

चिखलामुळे ट्रॅक्टर आणि बैलगाड्या रस्त्यातच रुतत असल्याने शेतीसाठी आवश्यक साहित्य वेळेत शेतात पोहोचत नाही. त्यामुळे पेरणी व इतर शेतीकामे विलंबाने होत असून, त्याचा थेट परिणाम पिकांच्या उत्पादनावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.मंगरूळ कांबे व शेलू परिसरातील शेतकऱ्यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेक वेळा प्रशासनाकडे निवेदने दिली असून, सातत्याने पाठपुरावाही केला आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त होत असून, वाहनांची तर गोष्ट दूरच; पायी चालणेही धोकादायक बनते.”निवडणुकीत रस्ते दुरुस्तीची आश्वासने दिली जातात; मात्र पावसाळा सुरू झाला की आमच्या नशिबी गुडघाभर चिखलच येतो.

शेतीसाठी खते, बियाणे शेतात कसे न्यायचे, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे,” अशी प्रतिक्रिया शेतकरी नामदेव खांडेकर यांनी व्यक्त केली.शेतकऱ्यांनी मंगरूळ कांबे–शेलू पाणंद रस्त्याचे तातडीने खडीकरण करून तो वाहतुकीस योग्य बनविण्याची मागणी केली आहे. अन्यथा खरीप हंगामातील शेतीकामांवर गंभीर परिणाम होऊन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!