Join WhatsApp group

Ads

पोलिसांचा धाडसी पाठलाग अन् आरोपी गजाआड; अकोला पोलिसांची वेगवान कारवाई

By Sarkar Maza

June 30, 2026 10:17 pm

Ads

अकोला | प्रतिनिधी | दि. ३० जून २०२६


अकोला शहरात मंगळवारी दुपारी भरदिवसा घडलेल्या थरारक हल्ल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. जुने शहर येथील नगरसेविका रफिया बी. याकुब खान यांचे पती याकुब खान युनुस खान यांच्यावर भररस्त्यात चाकूने सपासप वार करून जीवघेणा हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या याकुब खान यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या प्रकरणात पोलिसांनी प्रसंगावधान राखत मुख्य आरोपीला घटनास्थळावरून पळून जात असताना काही क्षणांतच पकडले असून त्याचा साथीदार अद्याप फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. ३० जून) याकुब खान हे रेल्वे स्टेशन परिसरातून अग्रसेन चौकाच्या दिशेने ओला कंपनीच्या इलेक्ट्रिक दुचाकीवरून जात होते. जिजाऊ हॉलसमोरील रस्त्यावर विरुद्ध दिशेने आलेल्या वसीम अहमद उर्फ चांवडया गुलाम अयुब याने आपल्या मोटारसायकलवर लाल टी-शर्ट परिधान केलेल्या एका साथीदारासह याकुब खान यांच्या दुचाकीला मुद्दाम धडक दिल्याचा आरोप आहे.


धडक लागताच याकुब खान रस्त्यावर कोसळले. त्याच वेळी मोटारसायकलवरील साथीदार घटनास्थळावरून पळून गेला. त्यानंतर वसीम अहमद याने जवळ बाळगलेल्या धारदार चाकूने याकुब खान यांच्या छाती, पोट आणि डाव्या मांडीवर सपासप वार केले. अचानक झालेल्या या रक्तरंजित हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.


दरम्यान, आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना रामदासपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रविण ढगेकर यांनी अत्यंत धाडस आणि तत्परता दाखवत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आरोपीचा पाठलाग केला आणि काही क्षणांतच त्याला शिताफीने पकडून ताब्यात घेतले. त्यांच्या या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.


घटनेनंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने गंभीर जखमी याकुब खान यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना आयकॉन हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.


प्राथमिक तपासात मृत याकुब खान आणि आरोपी वसीम अहमद हे एकमेकांचे परिचित तसेच नातेवाईक असल्याचे समोर आले आहे. दोघांमध्ये जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. नेमक्या वादाचे कारण आणि त्यामागील पार्श्वभूमीचा तपास सुरू आहे.


या प्रकरणी इस्माईल खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामदासपेठ पोलीस ठाण्यात सुरुवातीला गुन्हा क्र. ४३१/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९(१) व ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र याकुब खान यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने या गुन्ह्यात कलम १०३(१) (खून) ची भर घालण्यात आली असून न्यायालयालाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.


दरम्यान, मुख्य आरोपीसोबत घटनास्थळी असलेल्या फरार साथीदाराचा शोध घेण्यासाठी रामदासपेठ पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेची विशेष पथके रवाना करण्यात आली असून लवकरच त्यालाही अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.


ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी (शहर) सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रामदासपेठ पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांच्या नेतृत्वात पार पडली. या कारवाईत पोउपनि संदीप बालोद, स.पो.उपनि किरण गवई, पोलीस हवालदार प्रविण ढगेकर तसेच रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Related Article

दोनद येथील दुर्घटनेनंतर शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमाबाबत विविध दावे, पालकांकडून विविध आरोप; सत्य समोर आणण्यासाठी निष्पक्ष चौकशीची मागणी

अवैध सावकारांच्या पाशातून शेतकऱ्यांची मुक्तता करा; राज्यव्यापी हेल्पलाईनची आमदार हरीश पिंपळेंची विधानसभेत मागणी

अकोल्यात खळबळ! भररस्त्यात याकूब पहलवान यांच्यावर जीवघेणा चाकू हल्ला; उपचार दरम्यान मृत्यू

निसर्गाच्या तडाख्याने दहिकर कुटुंब उघड्यावर; अश्रूंनाही बांध फुटला, मदतीसाठी समाजासह शासनानेही पुढे येण्याची गरज

अकोल्यातील गुलाब नगर परिसरात अवैध पेट्रोल साठा जप्त; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

दोनद येथे अंघोळीसाठी गेलेल्या ३८ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून अंत

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!