Join WhatsApp group

Ads

-

सरकार माझा विशेष वृत्त: अकोल्यातील नशेच्या बाजाराचा ‘तो’ अदृश्य सूत्रधार कोण?

By Sarkarmzanews

November 13, 2026 12:40 am

Ads

बिर्ला रेल्वे कॉलनीत दोन जण ताब्यात; ११.३० लाखांचा मुद्देमाल जप्त – १८५ किलोच्या जिल्हास्तरीय कारवायांनंतरही तरुणाईच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

सरकार माझा न्यूज | विशेष वृत्त

अकोला: अमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेल्या तरुणाईचे भयावह चित्र ‘उडता पंजाब’ चित्रपटातून देशाने पाहिले होते. व्यसनाच्या आहारी गेलेली पिढी, उद्ध्वस्त होणारी कुटुंबे आणि नशेच्या पैशातून फोफावणारी गुन्हेगारी… चित्रपटातील हे वास्तव आज अकोल्याच्या संदर्भात आठवण्याचे कारण म्हणजे शहरात पुन्हा एकदा समोर आलेली एमडी अमली पदार्थांची कारवाई! बिर्ला रेल्वे कॉलनी परिसरातून ५६ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात आले. मुद्देमालाची किंमत ११ लाख ३० हजार रुपये सांगितली जात आहे. मात्र या कारवाईने उघड झालेला प्रश्न जप्तीच्या वजनापेक्षा कितीतरी मोठा आहे. पोलिसांच्या हाती ५६ ग्रॅम लागले; पण त्याआधी किती ग्रॅम नशा शहरातील तरुणांपर्यंत पोहोचली असेल?

पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘ऑपरेशन प्रहार – नार्को स्ट्राईक’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला ११ नोव्हेंबर रोजी बिर्ला रेल्वे कॉलनी परिसरात एमडी विक्रीसाठी असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

त्यानंतर पथकाने नियोजनबद्ध कारवाई करीत शेख कासम शेख आजम (२५) आणि गुलाम तोफिक कामरान गुलाम रफिक या दोघांना ताब्यात घेतले. पंचांसमक्ष केलेल्या झडतीत पांढऱ्या रंगाची पावडर असलेली प्लास्टिक पिशवी मिळाली. प्राथमिक तपासणीत ती एमडी असल्याचे निष्पन्न झाले. ५६ ग्रॅम एमडीची किंमत ११ लाख २० हजार रुपये, तर मोबाईलची किंमत १० हजार रुपये असा एकूण ११ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रामदास पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६०९/२६ अन्वये एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क) व २२(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

जप्ती होतेय; मग नशेच्या बाजाराचा विस्तार किती?

अकोला जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात आतापर्यंत २२ कारवाया करून १८५ किलो मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस विभागाने दिली आहे. या मुद्देमालाची किंमत ८८ लाख ८३ हजार रुपये असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. ही आकडेवारी पोलिसांच्या कारवाईची व्याप्ती दाखवते; पण याच आकडेवारीतून एक अस्वस्थ करणारा प्रश्न पुढे येतो. जिल्ह्यात अमली पदार्थांचा साठा सापडतोय, विक्रीचे संशयित पकडले जात आहेत, मग या पदार्थांचा पुरवठा नेमका कुठून होतोय? जप्तीपूर्वी किती व्यवहार झाले? किती ग्राहकांपर्यंत हे पदार्थ पोहोचले? आणि या संपूर्ण व्यवहारामागे कोणाचे आर्थिक हितसंबंध आहेत?

जप्त झालेला माल हा पोलिसांच्या हाती लागलेला साठा आहे. यापूर्वी विक्री झालेल्या किंवा ग्राहकांपर्यंत पोहोचलेल्या पदार्थांची एकत्रित माहिती समोर नसल्यास केवळ जप्तीच्या आकड्यांवरून अमली पदार्थांच्या धोक्याची व्याप्ती ठरवता येणार नाही. शहरातील तरुणांमध्ये एमडीसारख्या घातक पदार्थांचा संपर्क वाढत असेल, तर त्याचे परिणाम केवळ आजच्या पिढीवर नव्हे, तर अनेक कुटुंबांच्या भविष्यावर होऊ शकतात.

एमडीसारखे उत्तेजक पदार्थ हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढवू शकतात. मेंदूच्या कार्यावर, मानसिक आरोग्यावर आणि शरीराच्या तापमान नियंत्रणावर गंभीर परिणाम होऊ शकतात. काही परिस्थितींमध्ये जीवघेण्या गुंतागुंतीही निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हा प्रश्न केवळ पोलिसांच्या गुन्हे नोंदवहीपुरता मर्यादित नसून सार्वजनिक आरोग्याचा बनला आहे.

आत्ता तरुणाईपर्यंत पोहोचलेली नशा कोण मोजणार?

पोलिसांच्या कारवाईत जप्त होणाऱ्या प्रत्येक ग्रॅमची नोंद होते; मात्र जप्तीपूर्वी विक्री झालेल्या पदार्थांचा मागोवा घेणे तितकेच आवश्यक आहे. किती तरुण अमली पदार्थांच्या संपर्कात आले, किती जणांना व्यसनमुक्ती उपचारांची गरज भासली आणि किती कुटुंबे या समस्येशी झगडत आहेत, याची जिल्हास्तरीय वस्तुस्थिती समोर येणे गरजेचे आहे.

आज पालक आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, करिअरसाठी आणि सुरक्षित भविष्यासाठी धडपडत आहेत. मात्र त्याच मुलांच्या आसपास अमली पदार्थांचे जाळे सक्रिय असेल, तर ही बाब प्रत्येक कुटुंबासाठी धोक्याची घंटा आहे. मुलांच्या वर्तनातील अचानक बदल, अनाकलनीय पैशांची मागणी, चुकीची संगत किंवा मानसिक अस्वस्थता याकडे पालकांनी दुर्लक्ष करू नये. संशय आल्यास मुलांशी संवाद साधावा आणि गरज पडल्यास तज्ज्ञांची मदत घ्यावी.

विक्रेत्यांपलीकडील चेहरे तपासात येणार का?

या प्रकरणात आता पोलिसांसमोर सर्वात मोठे आव्हान आहे ते पुरवठा साखळीच्या मुळापर्यंत पोहोचण्याचे. जप्त केलेल्या मोबाईलमधील संपर्क, आर्थिक व्यवहार, डिजिटल पुरावे, पदार्थाचा स्रोत आणि संभाव्य ग्राहक यांची सखोल तपासणी झाली, तर या व्यवहारामागील मोठे चेहरे समोर येऊ शकतात.

‘ऑपरेशन प्रहार’ची खरी परीक्षा आता!

पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थांविरोधात स्वतंत्र अमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नागरिकांना अमली पदार्थांची विक्री, साठवणूक किंवा वाहतुकीबाबत माहिती असल्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख यांच्या ८८८८०९६०४६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नशामुक्त भारताच्या संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर अशा कारवायांना अधिक व्यापक स्वरूप देण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया पोलीस अधीक्षक आजचे चांडक यांनी दिली पण मात्र केवळ छापे, जप्ती आणि आरोपींच्या अटकेवर समाधान मानून चालणार नाही. अमली पदार्थांचा स्रोत, वाहतूक मार्ग, आर्थिक व्यवहार आणि अंतिम लाभार्थ्यांपर्यंत तपास पोहोचणे आवश्यक आहे.

अकोल्यात ५६ ग्रॅम एमडी जप्त झाले, ही पोलिसांची कारवाई आहे; पण त्या ५६ ग्रॅममागे दडलेला संभाव्य धोका हा संपूर्ण जिल्ह्याच्या चिंतेचा विषय आहे. जप्त झालेल्या अमली पदार्थांचा हिशेब पोलिसांकडे आहे; आता तरुणाईपर्यंत पोहोचलेल्या नशेचा मागोवा घेण्याची वेळ आली आहे.

अकोल्याला ‘उडता पंजाब’सारख्या चित्रपटातील भयावह वास्तवाची पुनरावृत्ती नको असेल, तर आजच कठोर कारवाई, प्रभावी जनजागृती आणि पालकांची सतर्कता आवश्यक आहे. अन्यथा आजची जप्ती उद्याच्या मोठ्या संकटाची केवळ एक छोटीशी नोंद ठरू शकते.

प्रश्न ५६ ग्रॅमचा नाही… प्रश्न अकोल्याच्या पुढच्या पिढीचा आहे!

सरकार माझाची शोधपत्रकारिते अनुसार :-

राजकीय आशीर्वाद की केवळ योगायोग?

अकोला शहरातील एका नामांकित लोकप्रतिनिधीच्या निवासस्थानाजवळ राहणाऱ्या व्यक्तीचे या एमडी प्रकरणाशी धागेदोरे जोडले जात असल्याची चर्चा सामान्य नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. हा व्यक्ती नेमका कोण? संबंधित लोकप्रतिनिधीचा जवळचा की नातेवाईक? या चर्चेत तथ्य किती, हे तपासातूनच स्पष्ट होईल. मात्र राजकीय जवळीक किंवा आशीर्वादामुळे तपासाची दिशा बदलणार नाही ना, आणि अकोला पोलीस या व्यक्तीपर्यंत पोहोचून सत्य बाहेर आणणार का, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!