Join WhatsApp group

Ads

---

कायद्यापुढे कोणाचीही ‘व्हीआयपी’ एंट्री नाही; मुर्तीजापूरात डीजेविना गणेश विसर्जन सक्सेस!

By Sarkarmzanews

September 26, 2026 12:39 am

Ads

डीजेविना शांततेत विसर्जन; न्यायालयीन निर्देशांची अंमलबजावणी, पोलिसांची आणि शासकीय अधिकारी वर्गाची स्मार्ट रणनीती अन् राजकीय दबावालाही न जुमानता प्रशासनाची भूमिका

मुर्तीजापूर : गणपती विसर्जनाच्या मिरवणुका पार पडल्या आणि त्यानंतर मुर्तीजापूर शहरात एकच चर्चा सुरू झाली—“जे वर्षानुवर्षे अशक्य वाटत होते, ते यंदा शक्य झाले!”

उच्च न्यायालयाच्या निर्देशांसह जिल्हाधिकारी प्रशासनाच्या आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करत यंदा गणेश विसर्जन शांततेत आणि पारंपरिक पद्धतीने पार पडले. डीजेचा अतिरेक, प्रचंड आवाज आणि त्यातून निर्माण होणाऱ्या संभाव्य कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांना यंदा मोठ्या प्रमाणात आळा बसला.

कावड यात्रेदरम्यान झालेल्या डीजेच्या अतिरेकानंतर

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुज्ञ नागरिकांनी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच शहर व ग्रामीण पोलीस प्रशासनाकडे निवेदने दिली होती. त्यानंतर हा विषय न्यायालयीन पातळीवरही गेला. अखेर विसर्जनाच्या दिवशी प्रशासनाने आदेशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून दाखवली.

विसर्जनाच्या दिवशी आदेशांची खरी परीक्षा

न्यायालयीन निर्देश आणि प्रशासनाच्या आदेशांची अंमलबजावणी प्रत्यक्ष विसर्जनाच्या दिवशी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र विसर्जन मिरवणुका सुरू झाल्यानंतर परिस्थितीने वेगळेच चित्र दाखवले.

उपविभागीय अधिकारी, तहसीलदार,उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर परिषद मुख्याधिकारी, शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यांचे ठाणेदार व अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी समन्वयाने बंदोबस्त सांभाळला. डीजेचा अतिरेक नसल्याने मिरवणुकांमध्ये अनावश्यक तणावाचे वातावरण निर्माण झाले नाही.

‘गणपती उचलणार नाही’ अशा दबावाच्या चर्चांनाही पोलिसांनी दिले कायद्याने उत्तर

विसर्जनापूर्वी काही राजकीय प्रभाव असलेल्या मंडळींकडून प्रशासनावर दबाव आणण्याचे प्रयत्न झाल्याची आणि “डीजे नसेल तर गणपती उचलणार नाही” अशा स्वरूपाच्या चर्चांची शहरात चर्चा होती. मात्र पोलिसांनी कोणत्याही दबावाला थेट संघर्षाचे रूप न देता कायद्याच्या चौकटीत, संवाद आणि नियोजनाच्या माध्यमातून परिस्थिती हाताळली.

याच ठिकाणी पोलीस प्रशासनाची रणनीती चर्चेत आली. भावनिक वातावरण तापू न देता आदेशांची अंमलबजावणी आणि उत्सव सुरळीत पार पाडणे—या दोन्ही गोष्टी पोलिसांनी साध्य केल्याचे चित्र दिसले.

राजकीय ब्रँडिंगच्या मंडळांना ‘विशेष एंटरटेनमेंट’ नाही!

गणेशोत्सवाच्या माध्यमातून राजकीय जनसंपर्क आणि ब्रँडिंग करण्याची परंपरा अनेक ठिकाणी दिसते. मोठे डीजे, मोठी मिरवणूक आणि त्यातून राजकीय शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्नही काही मंडळांकडून केला जातो.

यंदा मात्र प्रशासनाने अशा अपेक्षांना कायद्यापेक्षा वरचे स्थान दिले नाही. वरिष्ठ राजकीय लोकप्रतिनिधींशी संबंधित किंवा राजकीय ब्रँडिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या मंडळांनाही नियमांमध्ये विशेष सवलत मिळाली नाही, अशी चर्चा शहरात आहे.

यातून एक संदेश मात्र स्पष्ट झाला—मंडळ कोणाचेही असो, नियम सर्वांसाठी समान असतील तरच प्रशासनावरील जनतेचा विश्वास मजबूत होतो.

पोलीस कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरही दिसला फरक

विसर्जन मिरवणुकीतील बंदोबस्त म्हणजे पोलिसांसाठी मोठी जबाबदारी. मात्र यंदा डीजेचा कर्णकर्कश आवाज, आवाज कमी करण्यावरून होणारे वाद किंवा त्यातून निर्माण होणाऱ्या संभाव्य कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीचा सामना तुलनेने कमी झाला.

त्यामुळे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या चेहऱ्यावर ‘आजची ड्युटी तुलनेने शांत आहे’ असा दिलासा दिसून आला.

डीजे गेला; पारंपरिक वाद्यांचा आवाज घुमला!

डीजे नसल्याने उत्सवाची रंगत कमी होईल, अशी काहींची भीती होती. मात्र प्रत्यक्षात पारंपरिक वाद्यांनी मिरवणुकांना वेगळीच रंगत आणली.

ढोल-ताशे, बँड आणि पारंपरिक वाद्य वाजवणाऱ्या कलावंतांना रोजगार मिळाला. त्यामुळे वर्षानुवर्षे या कलेवर उपजीविका करणाऱ्या कलाकार आणि संबंधित समाजघटकासाठी यंदाचा गणेशोत्सव नवसंजीवनी देणारा ठरल्याची भावना व्यक्त होत आहे.

वयोवृद्ध नागरिकांकडून प्रशासनाचे कौतुक

विसर्जन शांततेत पार पडल्याने शहरातील अनेक वयोवृद्ध नागरिकांनी प्रशासन आणि पोलिसांच्या भूमिकेचे कौतुक केले. धार्मिक उत्सव श्रद्धेने साजरा करताना ध्वनिप्रदूषण आणि अनावश्यक शक्तिप्रदर्शन टाळता येते, हे यंदाच्या अनुभवातून दिसून आल्याची चर्चा आहे.

राजकीय समीकरणांनाही मिळाला संदेश

गणेशोत्सव हा धार्मिक उत्सव असला तरी स्थानिक राजकारणात मंडळांची भूमिका महत्त्वाची ठरते. यंदा मात्र काही लोकप्रतिनिधी आणि मंडळांच्या अपेक्षा एका बाजूला, तर न्यायालयीन आदेश व प्रशासनाची भूमिका दुसऱ्या बाजूला असल्याचे चित्र होते.

अखेरीस राजकीय दबावापेक्षा कायद्याची अंमलबजावणी महत्त्वाची ठरली. काही राजकीय नेत्यांनी परिस्थिती समजून घेत प्रशासनाला सहकार्य केले, हीदेखील सकारात्मक बाब ठरली.

वकील संघटनेची भूमिकाही अखेरचा टप्प्यात महत्त्वाची

न्यायालयीन निर्देशांचे पालन झाले नाही तर न्यायालयीन अवमानाची कारवाई करण्याबाबत कायदेशीर भूमिका घेण्याची तयारी वकील संघटनेच्या पातळीवर व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे प्रशासनावरही आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अधिक स्पष्ट झाली.

न्यायालयीन निर्देश, प्रशासनाची अंमलबजावणी, पोलिसांचे नियोजन आणि नागरिकांचे सहकार्य—या सर्वांचा परिणाम यंदाच्या विसर्जनात दिसून आला.

गणपती गेले… पण एक प्रश्न मागे ठेवून गेले!

गणपती विसर्जन झाले. मिरवणुका संपल्या. ढोल-ताशांचा आवाज थांबला.

पण मुर्तीजापूरच्या नागरिकांसमोर एक प्रश्न मात्र उभा राहिला—

उत्सवाची ओळख मोठ्या आवाजाने असावी की मोठ्या श्रद्धेने?

राजकीय ब्रँडिंग महत्त्वाचे की नागरिकांची शांतता?

यंदाच्या विसर्जनाने या दोन्ही प्रश्नांवर शहराला प्रत्यक्ष अनुभवातून विचार करण्याची संधी दिली.

गणपती गेले… आता नवरात्र येत आहे; पाहूया, प्रशासनाचा ‘जोश’ कायम राहतो की पुन्हा ‘VIP ENTRY’ सुरू होते!

गणपती बाप्पा मोरया पुढचा वर्षी लवकर या!

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!