Join WhatsApp group

Ads

भक्तीचा उत्सव असावा, शक्तिप्रदर्शनाचा नव्हे; लाखपुरी कावड यात्रेत सामाजिक एकोप्याचे आवाहन

By Sarkarmzanews

August 25, 2026 7:32 am

Ads

लाखपुरी, ता. २४ : अकोला जिल्ह्यासह विदर्भातील विविध भागांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र लाखपुरी येथील श्री लक्षेश्वर संस्थानचा ऐतिहासिक व धार्मिक वारसा जपत यंदाचा कावड यात्रा महोत्सव उत्साहात, शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन आमदार हरीश पिंपळे यांनी केले.

कावड यात्रा ही केवळ धार्मिक परंपरा नसून भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याचे प्रतीक आहे. त्यामुळे यात्रेत डीजेचा वापर टाळून भजन, कीर्तन आणि पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून महादेवाची आराधना करावी, असे आवाहन त्यांनी केले.

श्रावण महिन्यात श्री लक्षेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी लाखपुरी येथे मोठ्या संख्येने भाविक दाखल होतात. कावड यात्रेनिमित्त अकोला जिल्ह्यासह अमरावती व इतर जिल्ह्यांतूनही कावडधारी मोठ्या संख्येने लाखपुरीकडे येतात. या पार्श्वभूमीवर भाविकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, वीजपुरवठा आणि रस्ते व्यवस्थेकडे संबंधित विभागांनी विशेष लक्ष देण्याची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली.

संबंधित विभागांना प्रशासनाच्या सूचना

उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी कावड यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभाग, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच अन्य संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या. यात्रेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, भाविकांना त्रास होऊ नये आणि वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांनी दिली.

कावडधारी व भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करावे तसेच कोणतीही अडचण किंवा अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

तहसीलदार शिल्पा बोबडे यांचा सत्कार

दरम्यान, मूर्तिजापूरच्या तहसीलदार शिल्पा बोबडे यांची उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

पत्रकारिता क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त अनवर खान यांचाही शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यावेळी नगराध्यक्ष हर्षल साबळे, ठाणेदार धर्मेश जोशी, अप्पर तहसीलदार गिरजादेवी, ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार दीपक महाडिक, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र नेमाडे, महावितरणचे अभियंता अजय कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता बजाज, अभियंता जंजाळ, भाजप तालुकाध्यक्ष नंदकिशोर राऊत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, कावड यात्रा आयोजन समितीचे पदाधिकारी, पत्रकार, लक्षेश्वर संस्थानचे पदाधिकारी तसेच महिला व पुरुष सेवाधारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री लक्षेश्वर संस्थानचे अध्यक्ष राजू दहापुते यांनी केले.

भक्ती, परंपरा आणि सामाजिक एकोप्याचा उत्सवलाखपुरीचा कावड यात्रा महोत्सव हा परिसरातील भाविकांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र मानला जातो. विविध ठिकाणांहून पवित्र जल घेऊन हजारो कावडधारी महादेवाच्या चरणी जल अर्पण करण्यासाठी लाखपुरीत दाखल होतात.

त्यामुळे या यात्रेला धार्मिकतेसोबतच सामाजिक ऐक्याचेही महत्त्व प्राप्त झाले आहे.भक्तीमय वातावरण, शिस्त, पारंपरिक संस्कृती आणि प्रशासनाला सहकार्य या चार बाबींवर भर देत यंदाचा कावड महोत्सव शांततेत व आदर्श पद्धतीने पार पाडण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!