Join WhatsApp group

Ads

-

पिंजर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा जुगार अड्ड्यांना उधाण? सेवा निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या कथित भूमिकेच्या चर्चेने खळबळ; निष्पक्ष चौकशीची मागणी

By Sarkar Maza

July 31, 2026 11:30 am

Ads

पिंजर मध्ये गावंडेला कोणाचे आशीर्वाद

पिंजर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध जुगार अड्डे पुन्हा एकदा जोमात सुरू असल्याची चर्चा परिसरात रंगली असून, या प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

काही महिन्यांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने या भागातील जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई करून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला होता. त्यावेळी अवैध धंद्यांवर कायमस्वरूपी आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.

मात्र काही काळ शांतता राहिल्यानंतर पुन्हा जुगाराचे अड्डे सुरू झाल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत.या पार्श्वभूमीवर सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे तो म्हणजे पूर्वी स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या कथित भूमिकेचा.

स्थानिक पातळीवर काहीजणांकडून असा दावा केला जात आहे की, संबंधित निवृत्त अधिकाऱ्याचा या अवैध धंद्यामध्ये या सेवा निवृत्त अधिकाऱ्याची छुपी पार्टनरशीप आहे.

या दाव्यांची कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.काही स्थानिकांकडून असा आरोपही केला जात आहे की, मुर्तिजापूर ग्रामीण व शहर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील काही जुगार अड्डे बंद करण्यासाठी दबाव टाकण्यात आला.

त्यामुळे त्या भागातील जुगार खेळणाऱ्यांचा ओघ पिंजर परिसरातील अड्ड्यांकडे वळल्याची चर्चा आहे. या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे, हे निष्पक्ष चौकशीतूनच स्पष्ट होऊ शकते.

काही व्यक्तींकडून असा दावाही केला जात आहे की, इतर भागातील जुगार अड्डे चालवणाऱ्यांना धमकावून त्यांचा धंदा बंद करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. हे आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे असले तरी त्याबाबत कोणतेही अधिकृत पुरावे किंवा पोलीस प्रशासनाची भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

वारंवार कारवाया होऊनही पिंजर परिसरातील अवैध जुगार अड्डे पुन्हा सुरू कसे होतात, हा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. जर पोलिसांनी पूर्वी प्रभावी कारवाई केली होती, तर त्याच ठिकाणी पुन्हा अवैध धंदे कसे फोफावले? स्थानिक प्रशासनाकडे याची माहिती आहे का? असल्यास कठोर कारवाई का होत नाही? असे अनेक प्रश्न चर्चेत आहेत.

जुगार हा केवळ कायद्याचा भंग नाही, तर त्यातून अनेक सामाजिक समस्या निर्माण होतात. अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडतात, तर गुन्हेगारीला देखील खतपाणी मिळते. त्यामुळे अशा अवैध धंद्यांविरोधात सातत्यपूर्ण आणि निष्पक्ष कारवाई होणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे.

या सर्व चर्चांमुळे संबंधित निवृत्त अधिकाऱ्याचे नाव सार्वजनिक पातळीवर घेतले जात असल्याने, जर या चर्चा निराधार असतील तर संबंधितांनी स्वतः पुढे येऊन आपली भूमिका स्पष्ट करावी. आणि जर आरोपांमध्ये काही तथ्य असल्याचे तपासातून समोर आले, तर कायद्यापुढे प्रत्येकजण समान असल्याने संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून सर्व आरोपांची पडताळणी करावी, संबंधितांचा जबाब नोंदवावा आणि वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. या प्रकरणात सत्य काय आहे, हे अधिकृत चौकशीनंतरच स्पष्ट होणार असले तरी वाढत्या चर्चेमुळे पिंजर परिसरातील अवैध धंद्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

photo – Ai Genrated

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!