Join WhatsApp group

Ads

मुर्तिजापूरात बालपण बेवारस; नगरपरिषद मात्र झोपेत!

By Sarkar Maza

May 24, 2026 12:50 pm

Ads

मुर्तिजापूर शहरात विकासाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जातात. लाखो रुपयांचे सौंदर्यीकरण, बाग-बगीचे, रंगरंगोटी आणि विविध कामांचे भूमिपूजन केले जाते. मात्र या सर्व विकासामध्ये शहरातील सर्वात महत्त्वाचा घटक — “लहान मुलांचे बालपण” — पूर्णपणे दुर्लक्षित झाल्याचे चित्र आज दिसून येत आहे.

शहरात अनेक बागा उभारल्या गेल्या, पण त्या फक्त नावापुरत्याच. मुलांसाठी सुरक्षित, आधुनिक आणि सर्व सुविधा असलेले एकही दर्जेदार बाल उद्यान आजपर्यंत नगरपरिषदेला उभे करता आले नाही, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.

विशेष म्हणजे शहरातील अनेक शासकीय जागांवर उद्याने आहेत, पण त्यांची अवस्था पाहिली तर नगरपरिषदेच्या नियोजनाचा आणि कारभाराचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचे दिसते.

गवत वाढलेले, स्वच्छतेचा अभाव, तुटलेले झोके, मोडकळीस आलेली खेळणी आणि बंद पडलेली लाईट व्यवस्था — हेच चित्र जवळपास प्रत्येक ठिकाणी दिसते. बोटावर मोजण्याइतके जे काही झोके उपलब्ध आहेत, त्यांचीही कोणतीही देखभाल केली जात नसल्याने ते तुटलेल्या अवस्थेत पडलेले आहेत. काही ठिकाणी हे तुटलेले साहित्य लहान मुलांसाठी धोकादायक ठरत आहे.

सर्वात मोठी गोष्ट म्हणजे लहान मुलांना “निवेदन देणे”, “आंदोलन करणे” किंवा “लोकप्रतिनिधींच्या दारात जाणे” हे समजत नाही. त्यांना फक्त खेळायचं असतं… धावायचं असतं… झोक्यावर झुलायचं असतं… मित्रांसोबत हसायचं असतं. पण त्यांच्या या साध्या भावनाही नगरपरिषद आणि लोकप्रतिनिधींना दिसत नसतील, तर ही शहरासाठी दुर्दैवाची बाब आहे.

आज शहरातील अनेक मुले मैदानाऐवजी मोबाईलमध्ये अडकत आहेत. कारण त्यांच्याकडे खेळण्यासाठी सुरक्षित जागाच नाही. रस्त्यावर खेळताना अपघाताची भीती, तर उद्यानात गेल्यावर तुटलेल्या झोक्यांचा धोका — अशा परिस्थितीत मुर्तिजापूरमधील बालपण अक्षरशः कैद होत चालले आहे.

नगरपरिषदेला फक्त निवडणुकीच्या काळात नागरिक आठवतात का?

शहरातील मुलांसाठी एखादे दर्जेदार, आकर्षक आणि सुरक्षित “चिल्ड्रन्स पार्क” उभारण्याची जबाबदारी कोणाची? की फक्त फलक लावणे आणि उद्घाटने करणे एवढेच काम उरले आहे?

आज गरज आहे ती फक्त बागांच्या नावाखाली निधी खर्च करण्याची नाही, तर प्रत्यक्षात मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारे उद्यान उभारण्याची.

आधुनिक झोके

साहसी खेळ

सुरक्षित खेळणी

स्वच्छ परिसर

सुरक्षा व्यवस्था

प्रकाश व्यवस्था

अशा सुविधा असलेले उद्यान प्रत्येक भागात उभे राहणे गरजेचे आहे.कारण शहराचा खरा विकास हा फक्त रस्ते आणि चौकांनी होत नाही… तर त्या शहरातील लहान मुले किती आनंदाने जगतात यावरून ठरतो.

मुर्तिजापूर नगरपरिषद आणि लोकप्रतिनिधींनी आता तरी जागे होण्याची गरज आहे. अन्यथा उद्या हीच मुले मोठी झाल्यावर एक प्रश्न नक्की विचारतील —“आमच्या बालपणासाठी तुम्ही नेमकं काय केलं?”

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!