Join WhatsApp group

Ads

--

शाळा दिसत नाहीत, अर्ज होत नाही; आरटीई प्रक्रियेत पालक त्रस्त एक किलोमीटर अट ठरतेय अडथळा.

By Sarkar Maza

March 6, 2026 4:12 pm

Ads

अकोला : दिनांक ०६ : शहरापासून साधारण पाच ते आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यंदाच्या आरटीई (RTE) मोफत प्रवेश प्रक्रियेत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. घरापासून केवळ एक किलोमीटरच्या परिघातील शाळाच निवडण्याची नवीन अट घालण्यात आल्यामुळे अनेक ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा मूलभूत हक्क मिळावा यासाठी आरटीई अंतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेशाची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, यंदा शाळा निवडताना केवळ एक किलोमीटर परिसरातील शाळाच निवडण्याची सक्ती करण्यात आल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे पर्याय मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत.

यापूर्वी एक, दोन व तीन किलोमीटर अंतरातील शाळा निवडण्याचा पर्याय उपलब्ध होता.अर्ज प्रक्रियेदरम्यान शहरालगतच्या गावांमधील विद्यार्थ्यांना एक किलोमीटर परिसरात शाळाच दिसत नसल्याने ऑनलाइन अर्ज भरता येत नसल्याच्या तक्रारी पालकांकडून केल्या जात आहेत. काही पालकांनी लोकेशन अचूक भरल्यानंतरही पोर्टलवर शाळा दिसत नाहीत किंवा अर्ज सबमिट होत नसल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, १७ फेब्रुवारीपासून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी आरटीईच्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मात्र, ग्रामीण भागातील अनेक शाळांचे लोकेशन गुगल मॅपवर उपलब्ध नसल्याने पालकांपुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे. काही ठिकाणी शाळांचे लोकेशन दुसऱ्याच गावाच्या हद्दीत दाखवले जात असल्याने अर्ज प्रक्रिया अपूर्ण राहत असल्याचेही समोर आले आहे.

त्यामुळे पालकांना वारंवार सायबर कॅफे किंवा सेवा केंद्रांवर जाऊन प्रयत्न करावे लागत असून वेळ आणि पैशांचा अपव्यय होत आहे.शहरांमध्ये शाळांची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर असल्याने विद्यार्थ्यांना पर्याय सहज मिळतात.

मात्र ग्रामीण भागात एक किलोमीटरच्या परिसरात मान्यताप्राप्त शाळा उपलब्ध नसल्याने अनेक अर्ज आपोआप बाद होत आहेत. परिणामी, सर्वांसाठी समान शिक्षण ही संकल्पना केवळ कागदावरच राहण्याची भीती पालकांकडून व्यक्त होत आहे.

‘आरटीई’च्या कक्षेबाहेर नामांकित शाळा?शासनाकडून शुल्क प्रतिपूर्ती वेळेत होत नसल्यामुळे काही शहरातील शाळा आरटीईपासून दूर जात असल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे. काही शाळांनी अल्पसंख्याक दर्जा घेतल्याने त्या आरटीईच्या कक्षेबाहेर गेल्या आहेत.

त्यामुळे २०२६-२७ च्या यादीत काही नामांकित शाळांची नावे नसल्याने पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाषिक अल्पसंख्याक शाळांमध्ये किमान ५१ टक्के विद्यार्थी संबंधित भाषिक गटातील आहेत का, याची पडताळणी करण्याची मागणीही होत आहे.

घरापासून एक किलोमीटरच्या आतच शाळा निवडण्याची सक्ती करणे विसंगत व तर्कहीन आहे. यापूर्वी एक, दोन व तीन किलोमीटर अंतरातील शाळा निवडण्याचा पर्याय असल्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक पर्याय उपलब्ध होत होते. आता एक किलोमीटर परिसरातील मोजक्याच शाळांपुरते पर्याय मर्यादित राहणार असल्याचे मत पालकवर्ग यांनी व्यक्त केले.

आरटीई महत्त्वाची योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी तांत्रिक अडचणी दूर करणे व ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शाळा निवडीचे अंतर वाढवण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे. अन्यथा अनेक पात्र विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!