Join WhatsApp group

Ads

-

जिद्दीची कमाल! भोवळ येऊनही रुग्णालयातून दिला बारावीचा गणित पेपर; श्रेयाचे वर्ष वाचले

By Sarkar Maza

February 23, 2026 5:21 pm

Ads

दिनांक २३ : मुर्तीजापुर : तालुक्यातील हिरपूर परीक्षा केंद्रावर बारावीच्या अत्यंत महत्त्वाच्या गणिताच्या पेपरच्या दिवशी परीक्षा केंद्रावरच एका विद्यार्थिनीला भोवळ येऊन ती बेशुद्ध पडली. मात्र प्रशासन, परीक्षा केंद्र आणि आरोग्य यंत्रणेच्या तत्पर समन्वयामुळे तिने रुग्णालयातूनच पेपर पूर्ण करत जिद्द आणि चिकाटीचे उदाहरण घालून दिले. हिरपूर येथील या घटनेमुळे विद्यार्थिनीचे शैक्षणिक वर्ष वाचले.


हिरपूर येथील अनंतराव देशमुख ज्युनिअर कॉलेजमध्ये २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता इयत्ता बारावीचा गणित विषयाचा पेपर सुरू होणार होता. विद्यार्थी सकाळी १०.३० वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर दाखल झाले होते. याचदरम्यान श्रेया गुणवंत देशमुख (बैठक क्र. व्हीओ १४९८६) हिची प्रकृती अचानक बिघडली. सुमारे १०.५० वाजता तिला भोवळ येऊन ती बेशुद्ध पडली.


परीक्षा केंद्रावरील कर्मचारी व उपस्थित पालकांनी तत्काळ हालचाल करत तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, तिचा पेपर वाया जाऊ नये यासाठी परिरक्षक केंद्राशी तातडीने संपर्क साधण्यात आला. विभागीय अध्यक्ष संदीप सांगवे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून परिस्थितीची माहिती देण्यात आली. त्यांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.


सुमारे ११.४० वाजता संबंधित अधिकारी रुग्णालयात पोहोचले. विद्यार्थिनीची प्रकृती स्थिर असल्याची खात्री करून ती पेपर देण्याच्या मानसिक तयारीत आहे का, याची विचारपूस करण्यात आली. श्रेयाने सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर पुढील कार्यवाही वेगाने सुरू झाली.


श्री गाडगे महाराज विद्यालय, मूर्तिजापूर येथून गोपनीयतेचे सर्व नियम पाळत प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका महिला पोलिसांच्या बंदोबस्तात ११.५० वाजता रुग्णालयात पोहोचविण्यात आल्या. महिला पोलिस कर्मचारी सरला पारोदे व पर्यवेक्षक ढोकणे यांची पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आली. परिरक्षक तथा गटशिक्षणाधिकारी वैशाली रामटेके व उपपरिरक्षक मोहम्मद इब्राहीम अली यांनी स्वतः उपस्थित राहून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत विद्यार्थिनीला परीक्षा देण्यासाठी आवश्यक वातावरण उपलब्ध करून दिले.


अशा प्रतिकूल परिस्थितीतही श्रेयाने धैर्य न गमावता रुग्णालयातूनच गणिताचा पेपर पूर्ण केला. योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे तिचे एक शैक्षणिक वर्ष वाया जाण्यापासून वाचले. विद्यार्थिनीच्या जिद्दीबरोबरच प्रशासनाच्या संवेदनशीलतेचेही सर्वत्र कौतुक होत आहे.


विद्यार्थिनीच्या पालकांनी विभागीय अध्यक्ष संदीप सांगवे, संबंधित अधिकारी, शिक्षक व कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले. या घटनेने “इच्छाशक्ती आणि योग्य समन्वय असेल तर कोणतीही अडचण मोठी नसते” हे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!