Join WhatsApp group

Ads

-

ठाकरे गटात ‘ऑल इज नॉट वेल’! युवासेनेच्या नाराजीवर विरोधकांची नजर

By Sarkarmzanews

August 31, 2026 7:06 pm

Ads

मुर्तिजापूर | प्रेमराज शर्मा

मुर्तिजापूर तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात ‘ऑल इज नॉट वेल’ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पक्ष वाढविण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या कार्यकर्त्यांच्या नशिबी उपेक्षा आणि काही मोजक्या मंडळींच्या हातात निर्णयप्रक्रियेची सूत्रे, अशी भावना निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. वर्चस्ववाद आणि घराणेशाहीच्या चर्चेने आता ठाकरे गटातील अंतर्गत धुसफूस अधिकच वाढल्याचे चित्र आहे.

कार्यकर्ते घाम गाळतात; निर्णय कुणाच्या मर्जीने?

पक्षासाठी आंदोलनां पासून संघटनात्मक कामापर्यंत धावणाऱ्या युवा कार्यकर्त्यांना निर्णयप्रक्रियेत अपेक्षित स्थान मिळत नसल्याची नाराजी काही पदाधिकाऱ्यांमध्ये असल्याची चर्चा आहे. ज्यांच्या खांद्यावर संघटनेची पालखी, त्यांनाच बाजूला करण्याचा प्रकार सुरू असेल तर पक्ष वाढणार कसा? असा सवाल नाराज कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

युवासेनेचे तालुक्यात सक्रिय संघटन असूनही त्यांच्याकडे दुय्यम नजरेने पाहिले जात असल्याची भावना काही पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाल्याचे समजते. ही नाराजी केवळ कुजबुजीपुरती राहणार की तिचे रूपांतर मोठ्या राजकीय निर्णयात होणार, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

घराणेशाहीचा आरोप; निष्ठावंतांची मात्र उपेक्षा?

मुर्तिजापूरच्या राजकारणात घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. पक्षासाठी वर्षानुवर्षे झटणाऱ्या कार्यकर्त्यांपेक्षा विशिष्ट व्यक्ती आणि कुटुंबाभोवती राजकारण केंद्रित होत असल्याची भावना काही कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे बोलले जात आहे.

पक्ष हा कार्यकर्त्यांच्या ताकदीवर उभा राहतो की काही मोजक्या व्यक्तींच्या प्रभावावर, हा प्रश्न आता स्थानिक शिवसैनिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

युवासेना फुटली तर फटका कुणाला?

युवासेना ही ठाकरे गटाची युवा ताकद मानली जाते. त्यामुळे या गटातील नाराजी दुर्लक्षित करणे पक्षासाठी महागात पडू शकते. काही प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्ष सोडण्याच्या मनःस्थितीत असल्याची चर्चा असून, यातील किती जण प्रत्यक्ष निर्णय घेतात याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

एक-दोन व्यक्तींची नाराजी वेगळी आणि संघटनेतील सामूहिक असंतोष वेगळा! जर हा असंतोष वाढत गेला तर त्याचा परिणाम आगामी स्थानिक राजकारणावर होण्याची शक्यता आहे.

विरोधकांच्या ‘हातात’ संधी?

ठाकरे गटातील संभाव्य नाराजीची चर्चा सुरू होताच इतर राजकीय पक्ष सक्रिय झाल्याचेही बोलले जात आहे. युवासेनेतील प्रभावी चेहरे आपल्या गोटात आणण्यासाठी पडद्यामागे संपर्क आणि राजकीय चर्चांना सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

ठाकरे गटातील नाराजी विरोधकांसाठी संधी ठरणार की ठाकरे गटाचे नेतृत्व वेळेत डॅमेज कंट्रोल करणार? याचे उत्तर आगामी काळात मिळणार आहे.

आता कसोटी नेतृत्वाची!

मुर्तिजापूरातील या राजकीय घडामोडींमध्ये सर्वाधिक कसोटी ठाकरे गटाच्या स्थानिक नेतृत्वाची लागणार आहे. नाराज कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन संघटना एकसंध ठेवली जाते की अंतर्गत संघर्षामुळे ‘आऊटगोईंग’ सुरू होते, यावर

पक्षाचे स्थानिक भवितव्य काही अंशी अवलंबून राहणार आहे.पक्षाची ताकद कार्यकर्त्यांमध्ये असते; आणि कार्यकर्तेच दुरावले तर वर्चस्वाच्या खुर्चीला अर्थ काय?

मुर्तिजापूर तालुक्यात सध्या राजकीय चर्चांना उधाण आले असून, ठाकरे गटातील ही धुसफूस केवळ वाफ आहे की वादळाची चाहूल—याचा फैसला येणाऱ्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे.

Related Article

हिरपूरच्या रस्त्यांची दुर्दशा; जबाबदारी बैलगाड्यांवर! प्रशासक सरपंच अमोल गढवेंच्या दाव्याने नवा सवाल

आमदार पिंपळेंच्या मनगटावर बहिणींच्या प्रेमाची राखी; हर्षल साबळेंच्या उपस्थितीत जुळले स्नेहबंध

“गुटखा पकडला तेव्हा अन्न विभाग पुढे; आरोपी अटकेत आला तेव्हा पोलिस पुढे… आता सत्याच्या तपासात कोण पुढे जाणार?”

अकोल्यात खाद्यतेल विक्रेत्यांवर FDAचा मोठा दणका; ११.८२ लाखांचा तेलसाठा जप्त

‘POCSO केस मागे घ्या, मग घर देतो’चा दबाव? नातेवाईकांनी घराबाहेर काढल्याचा कुटुंबाचा आरोप; ११ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

प्रेमसंबंधाचा धक्कादायक शेवट; अनिशचा विहिरीत मृत्यू, तरुणी बचावली अन् नंतर विषप्राशनाची माहिती”

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!