Join WhatsApp group

Ads

अखेर मुर्तिजापुरात धावली ‘शकुंतला’! नमो उद्यानात छोटी रेल्वे सुरू; चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची शिट्टी!

By Sarkarmzanews

November 26, 2026 8:15 am

Ads

ब्रिटिशकालीन ऐतिहासिक शकुंतलेच्या आठवणींना उजाळा; उद्यानातील छोट्या रेल्वेचा बालगोपाळांकडून मनमुराद आनंद

मुर्तिजापूर | सरकार माझा न्यूज

मुर्तिजापूरकरांच्या मनात घर करून असलेल्या ऐतिहासिक ‘शकुंतला’ रेल्वेची आठवण आता नव्या रूपात पुन्हा ताजी झाली आहे. शहरातील नमो उद्यानात सुरू करण्यात आलेली छोटी रेल्वे कालपासून धावू लागली असून, या रेल्वे सफरीचा लहान मुले मनमुराद आनंद घेत आहेत.

चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि रेल्वे सफरीचा उत्साह यामुळे नमो उद्यानात बालगोपाळांची रेलचेल पाहायला मिळत आहे.एकेकाळी मुर्तिजापूरची ओळख असलेल्या ब्रिटिशकालीन शकुंतला रेल्वेने मुर्तिजापूर-अचलपूर आणि मुर्तिजापूर-यवतमाळ या मार्गांवर अनेक वर्षे प्रवाशांची सेवा केली. या रेल्वेशी अनेक पिढ्यांच्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत. काळाच्या ओघात मूळ रेल्वेसेवा बंद झाल्यानंतर तिच्या आठवणी मात्र मुर्तिजापूरकरांच्या मनातून पुसल्या गेल्या नाहीत.

आता नमो उद्यानात सुरू झालेल्या छोट्या रेल्वेमुळे त्या ऐतिहासिक वारशाची आठवण नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे. विशेष म्हणजे, रेल्वे सुरू झाल्यापासून लहान मुलांमध्ये तिच्याबाबत विशेष आकर्षण निर्माण झाले असून, पालकांसोबत उद्यानात येणारी मुले या छोट्या रेल्वेची सफर करताना दिसत आहेत.

या उपक्रमासाठी आमदार हरीश पिंपळे यांच्या प्रयत्नांचा उल्लेख केला जात आहे. शहरातील मनोरंजनाच्या सुविधांमध्ये या छोट्या रेल्वेमुळे आणखी एक आकर्षणाची भर पडली आहे.

शकुंतलेचा वारसा नव्या पिढी पर्यंत!

मूळ शकुंतला रेल्वे पुन्हा तिच्या ऐतिहासिक मार्गावर धावेल का, हा प्रश्न आजही कायम आहे. मात्र, नमो उद्यानातील छोटी रेल्वे सध्या तरी चिमुकल्यांच्या आनंदाचे नवे केंद्र बनली आहे. मोठ्यांसाठी जुन्या आठवणींचा उजाळा, तर लहानग्यांसाठी रेल्वे सफरीचा नवा अनुभव, असे या उपक्रमाचे चित्र मुर्तिजापुरात पाहायला मिळत आहे.

शकुंतला पुन्हा धावली… यावेळी अंतर कापण्यासाठी नाही, तर चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी!

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!