Join WhatsApp group

Ads

आईची ममता ठरली काळाची शिकार; मुलाला वाचवताना दोघांचाही मृत्यू

By Sarkar Maza

June 12, 2026 11:27 am

Ads

मूर्तिजापूर |

अधिक मासानिमित्त पुण्यस्नानासाठी गेलेल्या माय-लेकावर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना मूर्तिजापूर तालुक्यातील समशेरपूर येथे गुरुवारी घडली.

वृषाली हरिदास खोत (वय ३५) आणि स्वराज हरिदास खोत (वय १०) यांचा काटेपूर्णा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अधिक मासानिमित्त गावातील काही महिला आणि स्वराज खोत हे धार्मिक स्नानासाठी काटेपूर्णा नदीवर गेले होते. स्नानादरम्यान स्वराजचा पाण्याचा अंदाज चुकल्याने तो खोल पाण्यात गेला आणि बुडू लागला.

आपल्या मुलाला वाचविण्यासाठी आई वृषाली खोत यांनी क्षणाचाही विलंब न करता नदीत उडी घेतली. मात्र, दोघांनाही पोहता येत नसल्याने ते पाण्याच्या प्रवाहात अडकले.

ही घटना पाहून त्यांच्यासोबत असलेल्या माधुरी खोत आणि मीरा चौधरी यांनीही मदतीसाठी नदीत उडी घेतली. मात्र, त्या दोघीही पाण्यात अडकून संकटात सापडल्या.

दरम्यान, किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या काही तरुणांनी प्रसंगावधान राखत तातडीने धाव घेतली आणि माधुरी खोत व मीरा चौधरी यांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले.

दरम्यान, वृषाली खोत आणि स्वराज खोत यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक नागरिकांनी व प्रशासनाने शोधमोहीम सुरू केली. काही वेळाच्या अथक प्रयत्नांनंतर दोघांचेही मृतदेह नदीत आढळून आले.

या दुर्दैवी घटनेमुळे समशेरपूरसह परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून खोत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

photo – AI GENRATED

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!