Join WhatsApp group

Ads

अखेर लेक परतली घरी! खदान पोलिसांच्या मेहनतीला यश

By Sarkar Maza

June 10, 2026 9:26 am

Ads

अकोला शहरासह आसपासच्या जिल्ह्यांत तब्बल ३० दिवस अहोरात्र शोधमोहीम राबवत खदान पोलिसांनी हरविलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा सुखरूप शोध लावला असून, मुलीला पालकांच्या ताब्यात देत त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलवला आहे.


प्राप्त माहितीनुसार, पोलीस स्टेशन खदान येथे सौ. भारती हरदयाल अहिरवाल (रा. बाबा मठजवळ, कैलाश टेकडी, खदान, अकोला) यांनी ६ मे २०२६ रोजी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या बहिणीची मुलगी कु. जया विजय वानखडे (वय १४ वर्षे) ही ३ मे २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजता धुणी-भांडी करण्यासाठी मावशीसोबत परिसरात गेली होती. मात्र प्रकृती ठीक नसल्याचे सांगून ती घरी जाण्यासाठी निघाली, परंतु घरी पोहोचलीच नाही.

नातेवाईक व परिसरात शोध घेऊनही ती मिळून न आल्याने खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी अप.क्र. १०३१/२०२६, कलम १३७(२) बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.


गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम ठाकरे करीत होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांनी चार विशेष पथके तयार करून व्यापक शोधमोहीम सुरू केली.


या पथकांनी अकोला शहरासह अकोट, बार्शीटाकळी, बोरगाव मंजू, मूर्तिजापूर, अमरावती, शेगाव आणि खामगाव परिसरातील बसस्थानके, रेल्वे स्थानके, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, उद्याने, मंदिरे व झोपडपट्ट्यांमध्ये शोध घेतला. तसेच ऑटोचालक, हॉटेल व्यावसायिक, फेरीवाले, पाणीपुरी विक्रेते यांना मुलीचा फोटो दाखवून माहिती गोळा करण्यात आली.


मुलीकडे मोबाईल नसल्यामुळे आणि कोणताही ठोस सुगावा मिळत नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. तरीही विशेष पथकाने शहरातील विविध चौकांतील सीसीटीव्ही फुटेज तपासले, बालकल्याण समिती व महिला समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून विविध जिल्ह्यांतील बाल निरीक्षण गृहांची माहिती घेतली.


अखेर गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बाळापूर नाका परिसरात शोधमोहीम राबवून अल्पवयीन मुलीचा शोध लावला आणि तिला सुखरूपपणे पालकांच्या स्वाधीन केले.

शोधमोहीमेतील ठळक बाबी

३० दिवसांत ६८५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी

२५ हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी अहोरात्र कार्यरत

४७ गावे व शहरांमध्ये शोधमोहीम

२४६ साक्षीदारांची चौकशी

३५ पेक्षा अधिक संशयितांच्या घरांची व मालमत्तांची तपासणी

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील आणि पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम ठाकरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय वानखडे तसेच खदान पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

खदान पोलिसांच्या चिकाटी, संयम आणि व्यावसायिक तपास कौशल्यामुळे एका कुटुंबाला पुन्हा आपल्या लेकीचे दर्शन घडले, ही बाब सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!