Join WhatsApp group

Ads

अवैध शस्त्र रॅकेटवर अकोला एलसीबीचा घाव ;शस्त्र विक्रीच्या साखळीचा तपास वेगात

By Sarkar Maza

June 7, 2026 9:23 pm

Ads

अकोला (प्रतिनिधी) – अकोला जिल्ह्यात अवैध शस्त्रास्त्रे बाळगणारे, जबरी चोरी करणारे व गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींविरोधात अकोला पोलिसांनी ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई करत रामदासपेठ व सिव्हील लाईन पोलीस ठाणे हद्दीतून दोन देशी कट्टे व जिवंत काडतुसे जप्त केली असून दोन आरोपींना अटक केली आहे.
यापूर्वी पातुर व उरळ पोलीस स्टेशन हद्दीतून दोन देशी कट्टे जप्त करण्यात आले होते. त्यामुळे दोन दिवसांत एकूण चार बेकायदेशीर अग्निशस्त्रे जप्त करून पाच आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या मोहिमेदरम्यान, नांदेड येथील आरोपी सुरज उर्फ सुऱ्या शंकर सोनटक्के याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील कारवाया करण्यात आल्या.


रामदासपेठ हद्दीत देशी कट्टा जप्त


स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मनपा शाळा क्रमांक ७ जवळील पाण्याच्या टाकीसमोर सापळा रचून सचिन मुकुंद बलखंडे (वय २२, रा. संत कबीर नगर, अकोला) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लोखंडी देशी बनावटीचा कट्टा (मॅगझीनसह) व एक जिवंत काडतूस असा सुमारे ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी रामदासपेठ पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट कलम ३, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिव्हील लाईन हद्दीत आणखी एक आरोपी जेरबंद
दुसऱ्या कारवाईत लहान उमरी परिसरातून आदेश उर्फ पप्पू प्रभाकर आठवले (वय २५, रा. आनंद नगर, लहान उमरी, अकोला) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक देशी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. या शस्त्रांची किंमतही सुमारे ४१ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी सिव्हील लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


नांदेड पोलिसांना हवा असलेला आरोपी अकोल्यात सक्रिय


तपासादरम्यान अटक करण्यात आलेले सुरज शंकर सोनटक्के व अतिश विष्णू सूर्यवंशी हे दोघेही नांदेड जिल्ह्यातील जबरी चोरीच्या गुन्ह्यात फरार आरोपी असल्याचे उघड झाले आहे. अकोल्यात केटरिंग व्यवसायाच्या आडून ते अवैध शस्त्रास्त्रे बाळगणे, विक्री करणे व जबरी चोरीसारख्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.


शस्त्रांचा पुरवठादार कोण?


या प्रकरणातील आरोपींनी ही शस्त्रे कुठून आणली, आणखी कोणाला विक्री केली आहे का, तसेच या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.


गंभीर गुन्ह्यांची पार्श्वभूमी


अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींविरुद्ध अवैध शस्त्र बाळगणे, जिवे मारण्याचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी व दरोडा यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईमुळे जिल्ह्यातील जबरी चोरी व इतर गंभीर गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.


कारवाईत सहभागी अधिकारी


ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकरराव शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. विजय जाधव, स.पो.नि. गोपाल जाधव, पएसआय माजिद पठाण तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!