Join WhatsApp group

Ads

भोंदूगिरीवर लगाम कधी? राजू बाबाचा दरबार सुरूच! शिवण मध्ये प्रशासनाला खुले आव्हान

By Sarkar Maza

April 9, 2026 3:00 pm

Ads

मूर्तिजापूर तालुक्यातील शिवण या गावात एका तथाकथित ‘राजू बाबा’ने अंधश्रद्धेचा बाजार मांडत सर्वसामान्य जनतेची सर्रास फसवणूक सुरू केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका संस्थेच्या नावाचा आधार घेत हा भोंदू बाबा अंगातील भूत काढणे, घरात समृद्धी आणून देणे, तरुण-तरुणींचे लग्न लावून देणे तसेच संतानप्राप्तीसाठी औषधे देणे अशा विविध प्रकारच्या ‘उपचारां’च्या नावाखाली लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळत आहे.

विशेष म्हणजे, या बाबाचा दरबार आठवड्यातील सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी नियमित भरत असून, मोठ्या संख्येने नागरिक त्याठिकाणी गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे. अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेल्या नागरिकांची ही परिस्थिती चिंताजनक मानली जात आहे.

Oplus_131072

धक्कादायक बाब म्हणजे, महिलांची फसवणूक करून त्यांच्याकडून 20 ते 40 हजार रुपये घेऊन तथाकथित ‘औषधे’ दिली जात असल्याची माहिती समोर आली आहे. या औषधांचा कोणताही वैज्ञानिक आधार नसून नागरिकांच्या आरोग्याशीही खेळ केला जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, राज्यात अशोक खरात यांसारख्या प्रकरणांवर जोरदार चर्चा सुरू असताना, शिवणमधील हा प्रकार प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. राज्य सरकारने भोंदू बाबांवर कडक कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिल्यानंतरही, शिवण येथील राजू बाबाची ‘दुकानदारी’ आजही खुलेआम आणि जोमात सुरू असल्याचे चित्र आहे.

त्यामुळे स्थानिक पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर संशय व्यक्त केला जात असून, आदेश असूनही कारवाई का होत नाही? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव आणि अंधश्रद्धेचा वाढता प्रभाव यामुळे अशा भोंदूगिरीला खतपाणी मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे. आता तरी प्रशासनाने ठोस कारवाई करून अशा प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!