Join WhatsApp group

Ads

--

वॉर्डनिहाय व्यायामशाळांचा घोटाळा?तरुणांच्या आरोग्याच्या नावाखाली साहित्य गायब, जबाबदार कोण?

By Sarkarmzanews

January 24, 2026 8:35 am

Ads

मूर्तिजापूर : दिनांक २२ : मुर्तिजापूर नगरपरिषदेच्या कार्यकाळात, पवन अव्वलवार नगराध्यक्ष असताना वॉर्डनिहाय व्यायामशाळा शहरात प्रत्यक्षात आल्या होत्या. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत मिळालेले हे साहित्य तरुणांच्या आरोग्य संवर्धनासाठी असल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले होते.

उद्देश चांगला होता, पण आज परिस्थिती पाहता या उद्देशावरच गंभीर प्रश्न उपस्थित होतात.कारण त्या काळात आलेल्या एकही व्यायामशाळा आज कार्यरत नाही. जर या व्यायामशाळा खरोखरच तरुणांच्या आरोग्यासाठी होत्या, तर त्या बंद का पडल्या? आणि त्यामधील महागडे व्यायामाचे साहित्य नेमके कुठे गेले?

हा प्रश्न केवळ दुर्लक्षाचा नसून संभाव्य भ्रष्टाचाराचा संशय निर्माण करणारा आहे.सार्वजनिक निधीतून आलेल्या साहित्याचा वापर न होणे, त्याचा कोणताही अधिकृत हिशोब उपलब्ध नसणे आणि आजवर चोरीची पोलीस तक्रार नोंद न झालेली असणे, ही बाब अत्यंत गंभीर आहे.

जर हे साहित्य चोरीला गेले असेल, तर जबाबदार अधिकारी व कर्मचारी कोण होते? त्यांनी वेळेत तक्रार का केली नाही? आणि त्यांच्यावर आजपर्यंत कारवाई का झाली नाही?आज या विषयाला आणखी एक महत्त्वाचा संदर्भ आहे.

पवन अव्वलवार यांचे लहान बंधू रोहित अव्वलवार सध्या उपनगराध्यक्ष आहेत. त्यामुळे भावाच्या कार्यकाळात सुरू झालेल्या या व्यायामशाळांबाबत सत्य बाहेर आणण्याची आणि चूक दुरुस्त करण्याची जबाबदारी आता त्यांच्यावर येऊन पडते.

अव्वलवार कुटुंबातील व्यक्तीनं शहराचा आरोग्यासाठी एक चांगला पाऊल उचलून इतिहास घडवला होता.

पण मागील सत्ताकाळात जर साहित्य चोरीला गेले असेल किंवा भ्रष्टाचार झाला असेल, तर दोषी अधिकारी व संबंधितांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.

मुर्तिजापूरची तरुणाई आजही व्यायामशाळेच्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहे.

शासनाचे क्रीडा धोरण कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरवायचे असेल, तर

– बंद पडलेल्या व्यायामशाळा पुन्हा सुरू करणे,– गायब झालेल्या साहित्याची चौकशी करणे,

– आणि चोरी अथवा भ्रष्टाचारात दोषी आढळलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे,हे अपरिहार्य आहे.

म्हणूनच सवाल स्पष्ट आहे—या व्यायामशाळा तरुणांच्या आरोग्यासाठी होत्या की काहींच्या फायद्यासाठी?

रोहित अव्वलवार उपनगराध्यक्ष म्हणून या प्रकरणात सभागृहात आवाज उठवून, चौकशीची मागणी करणार का?आणि दोषींवर कारवाई करून मुर्तिजापूरच्या तरुणांना पुन्हा व्यायामशाळा उपलब्ध करून देणार काय?

प्रश्नांची ठोस उत्तरे आणि कृती झाली, तरच नगरपरिषदेवरील जनतेचा विश्वास परत येईल; अन्यथा हा विषय भ्रष्टाचाराचे प्रतीक म्हणूनच ओळखला जाईल.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!