Join WhatsApp group

Ads

माना पोलिसांचा ‘ऑपरेशन प्रहार’ की दिखावा

By Sarkar Maza

May 15, 2026 8:03 am

Ads

पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर सुरू होते जुगार अड्डे; कारवाईनंतर माना पोलिसांवरच उठले प्रश्न

माना पोलीस स्टेशन हद्दीत अवैध जुगार अड्डे उघडपणे सुरू असताना पोलिस प्रशासन नेमकं काय करत होतं? असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रसार माध्यमांमध्ये जुगार अड्ड्यांच्या बातम्या झळकताच अखेर माना पोलिसांनी धावपळ करत दोन ठिकाणी धाड टाकून कारवाई केली. मात्र या कारवाईपेक्षा “इतके दिवस पोलिस झोपेत होते का?” याचीच चर्चा परिसरात रंगली आहे.

विशेष म्हणजे हे जुगार अड्डे दुसरीकडे कुठे नसून थेट पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर सुरू होते. त्यामुळे माना पोलिसांच्या गस्त, माहिती यंत्रणा आणि कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिकांच्या मते, गावात अनेक दिवसांपासून सट्टापट्टी सुरू होती, मात्र पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नव्हती.

मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांच्या “ऑपरेशन प्रहार” मोहिमेअंतर्गत दि. १४ मे रोजी ग्राम माना येथे दोन जुगार अड्ड्यांवर धाड टाकण्यात आली. पहिल्या कारवाईत गणी प्लॉट परिसरातून सय्यद ऐजाज सय्यद न्याहमत अली, प्रगोद आनंदराव सोळंके आणि रविंद्र रामचंद्र सरदार यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून सट्टापट्टीच्या चिठ्ठ्या, डॉट पेन, कार्बन तुकडे व १,९२० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

तर दुसऱ्या कारवाईत जुना प्लॉट परिसरातून अशोक पांडुरंग विल्हेकर आणि संतोष रमेश खडे यांना ताब्यात घेऊन १,१३० रुपयांची रोकड व जुगार साहित्य जप्त करण्यात आले.

दोन्ही कारवाईत मिळून फक्त ३,०५० रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला असला तरी या कारवाईने माना पोलिसांची कार्यपद्धतीच चर्चेत आली आहे.

“प्रसार माध्यमांनी बातमी दाखवल्यावरच पोलिसांना आली जाग?”

गावात सुरू असलेल्या अवैध धंद्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष होते का? की कोणाच्या आशीर्वादाने हे अड्डे सुरू होते? असे प्रश्न आता उघडपणे विचारले जात आहेत. नागरिकांमध्ये अशीही चर्चा आहे की, प्रसार माध्यमांनी आवाज उठवल्यानंतरच पोलिसांनी “दाखवण्यासाठी” कारवाई केली.

माना पोलिसांची ही कारवाई म्हणजे खरी गुन्हेगारीविरोधातील मोहीम की फक्त वरिष्ठांना दाखवण्यासाठीची औपचारिकता, याबाबतही गावात कुजबुज सुरू आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!