Join WhatsApp group

Ads

-

अकोल्याच्या दोन महिला बॉक्सर देशात तृतीय; राष्ट्रीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत कांस्य पदक

By Sarkar Maza

March 17, 2026 8:50 am

Ads

अकोला : पंजाबमधील जालंधर येथे लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित राष्ट्रीय आंतरविद्यापीठ महिला बॉक्सिंग स्पर्धेत अकोला क्रीडा प्रबोधिनीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत अकोल्याचे नाव देशपातळीवर उज्ज्वल केले. प्रबोधिनीच्या स्वप्ना चव्हाण आणि रेवती उंबरकर या दोन महिला बॉक्सरांनी कांस्य पदक पटकावत देशात तृतीय स्थान मिळवले.

दि. 9 ते 14 मार्च 2026 या कालावधीत झालेल्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी राष्ट्रीय महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत स्वप्ना चव्हाण हिने 54 ते 57 किलो वजनगटात तर रेवती उंबरकर हिने 57 ते 60 किलो वजनगटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत कांस्य पदक जिंकले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे दोन्ही खेळाडूंनी आगामी खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स स्पर्धेसाठीही पात्रता मिळवली आहे.

या स्पर्धेत अकोला क्रीडा प्रबोधिनीच्या एकूण आठ महिला बॉक्सरांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये 48 किलो वजनगटात ऋणाली डोंगरे, 57 किलो वजनगटात पलक झांबरे, 65 किलो वजनगटात रितिका बोस, 70 किलो वजनगटात गायत्री माटे, 75 किलो वजनगटात गौरी मुरूमकार, 80 किलो वजनगटात कंचन सुरांसे आणि 80 किलोपेक्षा अधिक वजनगटात पूर्वा गावंडे यांचा समावेश होता.

राष्ट्रीय स्पर्धेसाठी संघासोबत संघ व्यवस्थापक म्हणून डॉ. गणेश पोटे तर क्रीडा मार्गदर्शक म्हणून NS-NIS बॉक्सिंग प्रशिक्षक गजानन कबीर यांनी काम पाहिले.

या यशाबद्दल जिल्हाधिकारी वर्षा मीना, क्रीडा व शालेय शिक्षण आयुक्त डॉ. तनुजा राऊत, प्रा. डॉ. संजय काळे, डॉ. गजानन बढे, जिल्हा क्रीडा अधिकारी व आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक सतीशचंद्र भट्ट तसेच सहायक प्रशिक्षक आदित्य मने आणि योगेश निषाद यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून सत्कार केला.

अकोला क्रीडा प्रबोधिनीच्या खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या या यशामुळे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!