Join WhatsApp group

Ads

-

हातगावात रात्री ट्रॅक्टरची धावपळ; मुरुम चोरी कडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By Sarkar Maza

April 14, 2026 12:38 pm

Ads

नियम धाब्यावर बसवून महसुलाची लूट; पदाचा गैरवापर करून प्रशासनाला दबावात ठेवण्याचा नागरिकांचा आरोप

मुर्तिजापूर : हातगाव परिसरात रात्रीच्या अंधारात सुरू असलेल्या मुरुम चोरीच्या प्रकाराने गंभीर वळण घेतले असून, यामागे काही राजकीय पुढाऱ्यांचा वरदहस्त असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

सिंचन विहिरींचा मुरुम बेकायदेशीरपणे खासगी मालमत्तांवर टाकला जात असून, या सर्व प्रकारात शासनाचे नियम उघडपणे पायदळी तुडवले जात आहेत.

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता व गौण खनिज नियमांनुसार परवानगीशिवाय उत्खनन आणि रॉयल्टी न भरता मुरुम वाहतूक करणे हा दंडनीय गुन्हा आहे. तरीही हातगावात हा प्रकार उघडपणे सुरू असून, संबंधित यंत्रणा मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.

या प्रकरणात काही राजकीय पुढाऱ्यांवर थेट ताशेरे ओढले जात आहेत. गावाच्या विकासासाठी निवडून आलेले हेच लोक आज कायद्याला हरताळ फासत स्वतःच्या फायद्यासाठी नियमांची पायमल्ली करत असल्याचा आरोप होत आहे.

“जनतेचा विश्वासघात करून स्वतःचे खिसे भरणे, हाच का लोकप्रतिनिधींचा खरा चेहरा?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.पुढाऱ्यांची वाढती मनमानी आणि पदाचा उघड गैरवापर यामुळे प्रशासनावरही दबाव निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे.

परिणामी, रात्रीच्या वेळी उघडपणे मुरुम चोरी सुरू असतानाही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने, महसूल विभागाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नियमांनुसार बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्यांवर कठोर दंड, वाहन जप्ती आणि गुन्हा दाखल करण्याची तरतूद असतानाही, हातगावात कायद्याचा धाक उरला आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून, कोणत्याही राजकीय दबावाला न जुमानता दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी आता नागरिकांकडून होत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!