Join WhatsApp group

तंबाखूचे विष : आरोग्याचा घाला! अर्थव्यवस्थेचा घाला!

Photo of author

By Sarkarmzanews

Share

तंबाखू — हा शब्द उच्चारला, की मनाच्या कानाकोपऱ्यात एक काळोखी प्रतिमा डोकावते.धुरकट, कडवट, आणि हळूहळू जीव पोखरणारी सावली… जी माणसाच्या फुफ्फुसात, रक्तात, श्वासात आणि शेवटी संपूर्ण आयुष्यात पसरते.

ही केवळ एक सवय नाही; ती एक विषारी साखळी आहे, जी व्यक्तीला आरोग्यापासून वंचित करते, कुटुंबाच्या आनंदावर तुटून पडते आणि राष्ट्राच्या अर्थशक्तीवर चोरटी झडप घालते.

तंबाखूचा कहर – आकड्यांतून उलगडलेली कटू वस्तुस्थिती

टाटा मेमोरियल हॉस्पिटल — देशातील कर्करोग उपचारातील सर्वोच्च आणि प्रतिष्ठित संस्था — नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात एक हृदय पिळवटून टाकणारी वस्तुस्थिती समोर आणते:दरवर्षी १२ लाख नागरिक तंबाखूमुळे अकाली मृत्यूच्या दाढेत ओढले जातात.१२ लाख! — म्हणजे दररोज सुमारे ३,३०० जीव नष्ट होतात.

हे फक्त आकडे नाहीत; ते आहेत हजारो मातांचे हुंदके, हजारो पोरांचे अनाथ अश्रू, आणि हजारो कुटुंबांच्या उद्ध्वस्त झालेल्या संसारकथा.

अहवाल पुढे सांगतो

भारतातील तब्बल २७ कोटी नागरिक तंबाखूजन्य पदार्थांच्या विळख्यात अडकले आहेत. हे व्यसन हळूहळू पण निश्चितपणे कर्करोग, हृदयविकार, श्वसनसंस्थेचे विकार, दातांचे आजार आणि अनेक घातक विकारांना आमंत्रण देते.विशेष म्हणजे — सिगारेटचे सेवन एकट्यामुळेच दरवर्षी ३ लाख मृत्यू होतात! ही आकडेवारी आपल्याला हादरवून सोडते.

आरोग्यापासून अर्थव्यवस्थेपर्यंत –सर्वत्र संकटात

मेमोरियल हॉस्पिटलचे डॉक्टर म्हणतात —

“तंबाखूविरोधी लढा ही केवळ आरोग्याची मोहीम नाही, तर तो राष्ट्रहितासाठीचा आर्थिक संघर्ष आहे.”याचे कारण स्पष्ट आहे.

सरकारला तंबाखूपासून दरवर्षी सुमारे १७,००० कोटी रुपये कर मिळतात, पण त्याच्या दुष्परिणामांमुळे देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर, उत्पादकतेवर आणि उपचारांवर येणारा खर्च तब्बल १ लाख कोटी रुपये आहे!म्हणजेच आपण नफा कमावतो ‘सात आणे’ आणि नुकसान सहन करतो ‘सत्तावीस रुपये’!हे गणितच दाखवते की तंबाखू हा देशाच्या अर्थशक्तीवर एक मूक पण भयानक डाका आहे.

तंबाखूचा शेतकरी – श्रमाचे फळ कुणाला?

तंबाखू हा केवळ आरोग्याचा नव्हे तर कृषी व सामाजिक विळखा आहे.देशभरात जवळपास ३.५ कोटी शेतकरी तंबाखूची लागवड करतात.परंतु, त्यांना त्यातून मिळणारे उत्पन्न फारसे नाही. खरा नफा जातो तो मोठ्या तंबाखू उत्पादक कंपन्यांच्या खिशात.शेतकऱ्यांसाठी हे पीक बहुधा ‘जगण्यासाठीचा मार्ग’ वाटत असले, तरी प्रत्यक्षात ते त्यांना आणि समाजाला दोघांनाही हानी पोहोचवत आहे.

म्हणूनच पर्यायी पिके, प्रशिक्षण, बाजारपेठ आणि आर्थिक सहाय्य देणे ही कृषी मंत्रालयाची मोठी जबाबदारी आहे.मोहिमेतले विरोधाभासकाही वर्षांपूर्वी, तंबाखू उत्पादनांवर ८५ टक्के चेतावणी चित्रे छापण्याचा निर्णय झाला — हा खरोखरच जनजागृतीचा ऐतिहासिक टप्पा होता.

सरकारमधील काही मंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अशा मोहिमांना पाठिंबा देत आहेत.परंतु, काही शासकीय संस्थांनी यालाच “आंतरराष्ट्रीय आर्थिक अस्थिरता घडविणारा कट” म्हणून पाहिले.लोकहिताच्या मोहिमेवर संशय टाकणे, हा शासकीय समन्वयातील गंभीर दुरावा दाखवतो.आरोग्य आणि अर्थव्यवस्थेच्या या मोठ्या प्रश्नावर, सर्व यंत्रणा एकाच दिशेने चालल्या पाहिजेत.

उपायांचा मार्ग – फक्त प्रचार नव्हे, कृती हवी..

तंबाखूविरोधी लढा हा बहुआयामी असायला हवा:

1. शिक्षणातून जागृती – शाळा, महाविद्यालयांतून तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत व्यापक जनजागृती.

2. कडक कायद्यांची अंमलबजावणी – अल्पवयीनांना विक्रीवर पूर्ण बंदी, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानावरील कठोर शिक्षा.

3. पर्यायी रोजगार निर्मिती – तंबाखू लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी टिकाऊ, लाभदायक पिकांचे प्रोत्साहन.

4. आरोग्य व्यवस्थेचा बळकटीकरण – तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांच्या उपचारांसाठी विशेष केंद्रे.

5. शासनातील समन्वय – आरोग्य, कृषी, शिक्षण, वित्त, कामगार इ. सर्व मंत्रालयांचे संयुक्त प्रयत्न.

प्रत्येक नागरिकाचा सहभाग –

मोहिमेला नवी ताकदआज अनेक संस्थांनी, विशेषतः टाटा मेमोरियल हॉस्पिटलसारख्या आरोग्य सेवकांनी, तंबाखूविरोधी मोहिमेला एक सामाजिक आंदोलनाचे स्वरूप दिले आहे.परंतु, ही मशाल केवळ काही हातात न राहता प्रत्येक डॉक्टर, शिक्षक, पालक, समाजसेवक, पत्रकार आणि सजग नागरिकाच्या हातात यायला हवी.

कारण तंबाखूशी लढा देणे म्हणजे फक्त स्वतःचे नव्हे, तर भावी पिढीचे रक्षण करणे आहे.अंतिम आवाहनआरोग्यसंपन्न राष्ट्र हेच समृद्ध राष्ट्र!तंबाखू हा या राष्ट्राच्या आरोग्याचा एक मूक पण घातक शत्रू आहे.

त्याला हरवण्यासाठी केवळ कायदे किंवा मोहिमा पुरेशा नाहीत —गरज आहे ती दृढ निश्चयाची, सातत्यपूर्ण प्रयत्नांची आणि समाजाच्या एकदिलाने लढण्याची.

आपण सर्वांनी मिळून तंबाखूचे हे विष आपल्या समाजातून हद्दपार केले,तर आपण केवळ लाखो जीव वाचवू शकतो असे नाही,तर आपल्या देशाच्या अर्थशक्तीला, श्रमशक्तीला आणि आरोग्यशक्तीला नवे पंख लावू शकतो.

लेख – गजानन कुसुम ओंकार हरणे

समाजसेवक तथा संयोजक – निर्भय बनो जन आंदोलन जिल्हा परिषद नगर, खडकी, अकोला


Share

Leave a Comment

error: Content is protected !!