Join WhatsApp group

Ads

-

अकोल्यात शिक्षक बदली घोटाळा फुटला; 33 शिक्षक निलंबित, 65 जणांची वेतनवाढ रोखली

By Sarkar Maza

August 5, 2026 8:58 pm

Ads

अकोला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील जिल्हांतर्गत शिक्षक बदली घोटाळ्यात मोठी आणि धडक कारवाई करण्यात आली आहे. बनावट दिव्यांग, परित्यक्ता तसेच इतर खोट्या कागदपत्रांच्या आधारे बदली मिळवल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात चौकशीअंती 136 शिक्षक दोषी आढळले आहेत. त्यापैकी 33 शिक्षकांना तात्काळ निलंबित करण्यात आले असून 65 शिक्षकांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे.

उर्वरित दोषींवरही पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याने शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.या प्रकरणात बदलीचा लाभ मिळवण्यासाठी तब्बल 268 शिक्षकांनी दिव्यांग आणि परित्यक्ता असल्याची प्रमाणपत्रे सादर केल्याचा आरोप झाला होता.

चौकशीनंतर त्यातील 136 शिक्षकांनी नियमबाह्य पद्धतीने बदली मिळवल्याचे निष्पन्न झाले.अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर यांच्या आदेशानुसार 33 शिक्षकांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले आहेत. तसेच 65 शिक्षकांची वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली आहे.

यापूर्वी या घोटाळ्यात प्रभारी गट शिक्षणाधिकाऱ्यासह पाच अधिकाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई झाली होती.दरम्यान, या प्रकरणात केवळ विभागीय कारवाई करून चालणार नाही, तर बनावट कागदपत्रांचा वापर करणाऱ्या शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी ठाम मागणी भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांनी केली आहे.

यासाठी ते लवकरच अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तक्रारदार गणेश कुरई यांच्या आरोपानुसार, काही शिक्षकांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे सादर केली, तर काहींनी परित्यक्ता आणि एकल महिलांना मिळणाऱ्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी कथित खोट्या घटस्फोटाची कागदपत्रे तयार केली.

काहींनी वास्तव्यासंदर्भातील चुकीची माहिती दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणात शिक्षण आणि आरोग्य विभागातील काही अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या संगनमताचा संशय व्यक्त केला जात असून, या घोटाळ्यात कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराचीही शक्यता वर्तवली जात आहे.

‘शिक्षण मंदिरातील हा घोटाळा आता केवळ विभागीय चौकशीपुरता मर्यादित राहणार की दोषींवर फौजदारी कारवाई होणार?’ याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!