Join WhatsApp group

Ads

इंस्टाग्राम ‘गोल्डन मॅन’वर संशयाचे सावट; राजंदा गावात चर्चांना उधाण, आयकर-जीएसटी चौकशीची मागणी तीव्र

By Sarkar Maza

April 21, 2026 10:38 pm

Ads

अकोला: प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘गोल्डन मॅन’ म्हणून ओळख मिळवलेल्या एका व्यक्तीभोवती संशयाचे वातावरण अधिक गडद होत चालले आहे. अंगावर मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने परिधान करून व्हिडिओ व फोटो पोस्ट करत प्रसिद्धी मिळवणाऱ्या या व्यक्तीची जीवनशैली, संपत्तीचा स्रोत आणि त्याच्या अंगावरील सोने खरे की केवळ दिखावा, याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा रंगत आहे.

राजंदा गावात या ‘गोल्डन मॅन’बाबत विशेषतः चर्चांना उधाण आले असून, गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार संबंधित व्यक्ती “जमिनीतलं धन काढून” आपली प्रसिद्धी करत असल्याची चर्चा जोरात आहे.

काही नागरिकांनी या प्रकरणात भोंदूगिरी किंवा एखाद्या रॅकेटचा संशय व्यक्त केला असून, यामागील सत्य बाहेर यावे यासाठी सखोल आणि निष्पक्ष चौकशी होणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. तथापि, या आरोपांना अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.

माहितीनुसार, या ‘गोल्डन मॅन’ने अल्पावधीत सोशल मीडियावर मोठी लोकप्रियता मिळवली आहे. त्याचे व्हिडिओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामध्ये तो नेहमीच महागडे सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि आलिशान जीवनशैलीचे प्रदर्शन करताना दिसतो. यामुळेच त्याच्या उत्पन्नाचे स्रोत, व्यवसाय आणि आर्थिक व्यवहारांविषयी शंका उपस्थित होत आहेत.

स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, “अल्पावधीत एवढी मोठी संपत्ती उभी करणे सहज शक्य नसल्याने या प्रकरणात काहीतरी गूढ आहे. जर सर्व व्यवहार कायदेशीर असतील, तर चौकशी होण्यात कोणतीही अडचण नसावी.”

काहींनी तर उघडपणे आयकर विभाग आणि जीएसटी विभागाने तातडीने हस्तक्षेप करून संबंधित व्यक्तीच्या मालमत्तेची, उत्पन्नाच्या स्रोतांची आणि आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी करावी, अशी मागणी केली आहे.तज्ज्ञांच्या मते, सोशल मीडियावर संपत्तीचे उघडपणे प्रदर्शन केल्यास संबंधित यंत्रणांचे लक्ष वेधले जाणे स्वाभाविक आहे.

अशा प्रकरणांमध्ये जर आर्थिक व्यवहार पारदर्शक नसतील किंवा उत्पन्नाचे स्रोत स्पष्ट नसतील, तर आयकर आणि जीएसटी विभागाकडून चौकशी होणे ही नियमित प्रक्रिया आहे. त्यामुळे या ‘गोल्डन मॅन’ प्रकरणातही सत्य काय आहे, हे केवळ अधिकृत तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे.दरम्यान, या प्रकरणामुळे राजंदा गावासह परिसरात कुतूहलाचे आणि चर्चांचे वातावरण निर्माण झाले आहे.काही

नागरिक या प्रकरणाकडे केवळ सोशल मीडिया प्रसिद्धीचा भाग म्हणून पाहत असले, तरी अनेकजण यामागे गंभीर बाब दडलेली असू शकते, अशी शक्यता व्यक्त करत आहेत.सध्या या प्रकरणात कोणतीही अधिकृत चौकशी किंवा कारवाई सुरू झाल्याची माहिती समोर आलेली आहे.

आता संबंधित यंत्रणा या प्रकरणाची दखल घेऊन पुढे काय पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!