Join WhatsApp group

Ads

शासकीय रोपवाटिकेत गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ

By Sarkar Maza

May 23, 2026 1:38 pm

Ads

मुर्तिजापूर : शहर व तालुक्यात खळबळ उडवून देणारी घटना आज उघडकीस आली. मागील तीन दिवसांपासून बेपत्ता असलेले प्रवीण वानखळे (वय ४६, रा. सिरसो ता. मुर्तिजापूर) यांचा मृतदेह शासकीय कृषी विभागाच्या रोपवाटिका परिसरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रवीण वानखळे हे मागील तीन दिवसांपासून घरातून बेपत्ता होते. कुटुंबीयांकडून त्यांचा शोध सुरू असतानाच आज सकाळच्या सुमारास शासकीय कृषी विभागाच्या रोपवाटिका परिसरात एका व्यक्तीने झाडाला गळफास घेतल्याचे दिसून आले. याबाबत तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच मुर्तिजापूर शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून पंचनामा सुरू केला असून घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. मृत व्यक्तीची ओळख प्रवीण वानखळे अशी पटताच कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली.

नातेवाईकांचा दुःख पाहून उपस्थितांच्याही डोळ्यात पाणी आले.पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस विविध अंगांनी तपास करत आहेत.

तसेच प्रवीण वानखळे यांच्या बेपत्ता होण्यामागील कारणे, त्यांची मानसिक स्थिती आणि शेवटच्या काळात कोणाच्या संपर्कात होते का याचाही तपास केला जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

दरम्यान, शासकीय परिसरात अशी घटना घडल्याने नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सिरसो गावासह मुर्तिजापूर परिसरात शोककळा पसरली आहे. पुढील तपास मुर्तिजापूर पोलिसांकडून सुरू आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!