Join WhatsApp group

Ads

महसूल विभागाचा ‘सोल्यूशन मोड’ : मंत्री बावनकुळे यांच्या उपस्थितीत शिबिर

By Sarkar Maza

April 11, 2026 10:50 am

Ads

मूर्तिजापूर (दि. 11 एप्रिल 2026) : महाराष्ट्र शासनाच्या 17 फेब्रुवारी 2026 च्या शासन निर्णयानुसार राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीर अंतर्गत मूर्तिजापूर तालुक्यातील तिसरे शिबिर लाखपुरी येथे मोठ्या उत्साहात पार पडले. लक्षेश्वर संस्थान परिसरात आयोजित या शिबिरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला.

जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार व तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी शिबिराचे आयोजन केले. यावेळी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख उपस्थित होते.

शिबिरात राजस्व अभियानाच्या माध्यमातून आतापर्यंत अकोला जिल्ह्यात सुमारे 25 हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. उर्वरित कालावधीत आणखी 25 हजार लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्याचा मानस जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी व्यक्त केला.

आमदार हरीष पिंपळे यांनी शासनाच्या 48 महसुली निर्णयांमुळे सामान्य नागरिकांची कामे वेगाने होत असल्याचे सांगितले. तुकडेबंदीमुळे अडकलेली प्रकरणे मार्गी लागून सातबारा मिळत असल्याने नागरिकांना इतर योजनांचाही लाभ मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. आमदार रणधीर सावरकर यांनी प्रशासनाच्या कामकाजाचे कौतुक करत सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन केले.

या शिबिरात विविध विभागांचे एकूण 30 स्टॉल उभारण्यात आले होते. महसूल, पुरवठा, संजय गांधी योजना, महिला व बालविकास, महावितरण, परिवहन, आरोग्य, सेतू केंद्र, आधार, भूमी अभिलेख, नोंदणी विभाग आदींच्या माध्यमातून नागरिकांना डिजिटल सेवा, ई-फेरफार, ई-मोजणी, प्रमाणपत्र वितरण यांसारख्या सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या.

शिबिरादरम्यान एकूण 1317 प्रकरणांवर कार्यवाही पूर्ण करण्यात आली. यामध्ये 174 फेरफार प्रकरणे निकाली काढण्यात आली, 29 दुरुस्ती अर्ज स्वीकारण्यात आले, 181 डिजिटल 7/12 उतारे वितरित करण्यात आले, तसेच 638 प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीष पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या यशस्वी आयोजनासाठी महसूल विभागासह सर्व यंत्रणांनी सहकार्य केले असून लक्षेश्वर संस्थानाने जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रशासनाने आभार मानले.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!