Join WhatsApp group

Ads

--

जनतेचा पैसा ‘कचऱ्यात’! पनवेल पालिकेच्या घोट डम्पिंग ग्राऊंडवर कोट्यवधींचा ‘कचरा घोटाळा’?

By Sarkar Maza

May 29, 2026 9:48 am

Ads

कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांचे ‘अँटनी वेस्ट’च्या आडून काळे कारनामे?

पनवेल | कळंबोली | प्रतिनिधी |

पनवेल महानगरपालिका हद्दीतून गोळा होणारा घनकचरा घोट येथील डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जातो. या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी महापालिकेकडून कंत्राटदाराला प्रति टन तब्बल २५०० रुपये मोजले जातात. पालिकेच्या अधिकृत नोंदीनुसार शहरातून रोज ४०० ते ५०० टन कचरा या ठिकाणी येतो. परंतु, याच डम्पिंग ग्राऊंडवर आता कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचाराचा ‘डम्पिंग यार्ड’ बनवला असून, रोज लाखो रुपयांची मलई लाटली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, डम्पिंग ग्राऊंडचे व्यवस्थापन पाहणाऱ्या ‘अँटनी वेस्ट’ (Antony Waste) कंपनीचे तिथे कार्यरत असलेले काही कर्मचारी या महाघोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आहेत. पनवेल पालिका हद्दीबाहेरील व्यावसायिक, कारखाने किंवा इतर ठिकाणचा कचरा चोरट्या मार्गाने या डम्पिंग ग्राऊंडवर आणला जातो. कंपनीचे कर्मचारी हा बाहेरील कचरा पालिकेच्या अधिकृत कचऱ्यामध्ये वाढवून दाखवतात.

​या बदल्यात, ज्याचा कचरा आणला आहे, त्या खाजगी घटकांकडून हे कर्मचारी मोठी रोख रक्कम वसूल करतात. तर दुसरीकडे, पालिकेच्या वजनात हा कचरा वाढल्यामुळे कंत्राटदार कंपनीला पालिकेच्या तिजोरीतून प्रति टन २५०० रुपयांप्रमाणे अतिरिक्त पैसे मोजले जातात. रोज साधारण ५० टन कचरा अशाच प्रकारे बोगस वाढवला जात आहे. म्हणजेच, रोज सव्वा लाख रुपये आणि महिन्यातला तब्बल ३५ ते ४० लाख रुपयांचा चुना थेट पनवेलच्या जनतेच्या पैशातून लावला जात आहे.

​इतका मोठा गैरप्रकार रोज उघडपणे सुरू असताना स्थानिक प्रशासकीय अधिकारी आणि कंत्राटदार कंपनीचे वरिष्ठ याकडे डोळेझाक करत आहेत. त्यामुळे हा घोटाळा करणाऱ्या कंत्राटदाराच्या संबंधित कर्मचाऱ्यावर नेमका कोणाचा वरदहस्त आहे? पालिकेच्या अधिकाऱ्यांचेही यात साटंलोटं आहे का? असा संतप्त प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. जनतेच्या करातून जमा झालेला पैसा कचऱ्याच्या नावाखाली कंत्राटदाराचे खिसे भरण्यासाठी वापरला जात असल्याचा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

​महापालिकेच्या पैशांची ही सरळसरळ लूट असून, या प्रकरणी घोट डम्पिंग ग्राऊंडवरील सीसीटीव्ही फुटेज, कचऱ्याच्या गाड्यांच्या नोंदी आणि वजनाची काटेकोर तपासणी झाल्यास मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. या गंभीर प्रकारावर आता पनवेल महानगरपालिका प्रशासन आणि संबंधित कंत्राटदार कंपनी ‘अँटनी वेस्ट’ काय कारवाई करणार, की नेहमीप्रमाणे या घोटाळ्यावरही पडदा टाकण्याचा प्रयत्न होणार, याकडे संपूर्ण पनवेलकरांचे लक्ष लागले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!