Join WhatsApp group

Ads

अवघ्या दोन तासांत पोलिसांची कामगिरी; अमरावतीच्या महिलेची ₹1.12 लाखांची सोन्याची पोत शोधून केली परत

By Sarkar Maza

June 6, 2026 9:53 am

Ads

अमरावती येथील एका महिलेची गहाळ झालेली सुमारे ₹1 लाख 12 हजार किंमतीची सोन्याची पोत जुने शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अवघ्या दोन तासांत शोधून काढत संबंधित महिलेला सुखरूप परत केली. या तत्पर कामगिरीमुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


तहेसीन फातेमा मुफ्ती अली (वय 26, रा. छाया नगर, अमरावती) या 3 जून 2026 रोजी अमरावतीहून अकोला येथे आपल्या भावाकडे आल्या होत्या. रेल्वे स्थानकावरून ऑटोने त्या वाशिम बायपास परिसरातील हुसैनी मदरसा चौकात उतरल्या. मात्र घरी गेल्यानंतर त्यांना आपली सामानाची बॅग ऑटोमध्येच राहिल्याचे लक्षात आले.
या बॅगेमध्ये 7 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत होती. सदर दागिन्याची किंमत सध्याच्या बाजारभावानुसार सुमारे ₹1,12,000 इतकी आहे. याबाबत त्यांनी 4 जून रोजी जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.


तक्रार प्राप्त होताच जुने शहर पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. शहरातील विविध ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून संबंधित ऑटोचा शोध घेण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी ऑटो शोधून काढत त्यामधील गहाळ बॅग आणि सोन्याची पोत सुरक्षित अवस्थेत हस्तगत केली व ती तक्रारदार महिलेकडे सुपूर्द केली.


ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


कारवाईत पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अमलदार पंकज उपाध्याय, शेख असमल, श्रीकांत पवार, सागर शिरसाट, पवन डांबलकर, आशिष नांदोकार, शेख रिझवान आणि संदीप सदाशिव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.


या तत्पर आणि परिणामकारक कारवाईमुळे तक्रारदार महिलेने अकोला पोलिसांचे आभार मानले असून, पोलिसांच्या दक्षतेचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!