Join WhatsApp group

Ads

-

पोलिसांचे दुर्लक्ष? उड्डाण पुलावर अवैध पार्किंगमुळे बाजारदिवशी कोंडी

By Sarkar Maza

March 6, 2026 6:01 pm

Ads

मूर्तिजापूर : दिनांक ०६ : शहरातील आठवडी बाजाराच्या दिवशी उड्डाण पुलावर मोठ्या प्रमाणात होणारी अवैध पार्किंग नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

पुलावर दुचाकी व चारचाकी वाहने बेफामपणे उभी केली जात असल्याने वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण होत असून अपघाताचा धोका देखील वाढत आहे.आठवडी बाजाराला मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातून नागरिक खरेदीसाठी शहरात येतात.

मात्र वाहनतळाची योग्य व्यवस्था नसल्याने अनेक जण उड्डाण पुलावरच वाहने उभी करतात. परिणामी पुलावरील वाहतूक कोंडीत अडकते. विशेषतः संध्याकाळच्या वेळी दोन्ही बाजूंनी वाहनांची मोठी रांग लागते.

उड्डाण पुल हा वाहतुकीचा वेगवान मार्ग असताना येथेच पार्किंग होत असल्याने वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. काही वेळा वाहनचालकांना अचानक ब्रेक लावावे लागतात, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नागरिकांनी याबाबत अनेकदा नाराजी व्यक्त केली असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

वाहतूक पोलिसांनी आठवडी बाजाराच्या दिवशी विशेष मोहीम राबवून उड्डाण पुलावरील अवैध पार्किंगवर कारवाई करावी, तसेच पर्यायी वाहनतळाची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

उड्डाणपुल हा पार्किंगसाठी नव्हे तर सुरळीत वाहतुकीसाठी असतो. त्यामुळे वाहतूक कोंडी व संभाव्य अपघात टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!