Join WhatsApp group

Ads

--

वाडेगावात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ! प्रशांत ट्रेडर्समध्ये मुदतबाह्य अन्नपदार्थांचा साठा उघड

By Sarkarmzanews

February 12, 2026 12:44 pm

Ads

अकोला : दिनांक १२: बाळापुर तालुक्यातील वाडेगाव येथील काळे कॉम्प्लेक्स, बाळापुर–पातुर रोडवरील प्रशांत ट्रेडर्स येथे विक्रीसाठी ठेवलेले अनेक मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळून आल्याने अन्नसुरक्षा विभागाने कारवाई केली आहे. या प्रकरणामुळे नागरिकांच्या आरोग्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.


दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने अन्नसुरक्षा अधिकारी रवींद्र सोळंके यांनी ३० जानेवारी २०२६ रोजी आस्थापनेची सखोल तपासणी केली. तपासणीदरम्यान रवा (कमांडर), मैदा (कमांडर), पोहा (बटर), हळद पावडर (छत्री), बेसन (गोपाल), इंस्टंट नूडल्स (स्वॅगी), सॉल्टेड चिप्स (हल्दीराम) तसेच टाकाटक टँगो टोमॅटो (हल्दीराम) यांसह विविध अन्नपदार्थ मुदतबाह्य अवस्थेत विक्रीसाठी ठेवलेले आढळले. संबंधित अन्नपदार्थ जप्त करून पुढील आदेशापर्यंत विक्री अथवा नष्ट न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या प्रकरणी प्रशांत ट्रेडर्स विरोधात अन्न व औषध प्रशासन, अमरावती येथील न्यायनिर्णय अधिकाऱ्यांकडे खटला दाखल करण्यात येणार आहे.
तपासणीदरम्यान आस्थापनामध्ये अन्नसुरक्षा कायद्यानुसार आवश्यक परवाना दर्शनी भागात लावलेला नसल्याचे आढळले. तसेच किराणा व अन्नपदार्थ फरशीवर व भिंतीलगत अस्ताव्यस्त ठेवलेले होते.

दुकान परिसरात उंदीर व घुशींचा प्रादुर्भाव असून त्यावर नियंत्रणासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याचे निदर्शनास आले. येथे काम करणाऱ्या सहा कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे.


याशिवाय मुदतबाह्य अन्नपदार्थ वेगळे ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नव्हती तसेच अन्नपदार्थांच्या खरेदी-विक्रीच्या बिलांचा तपशीलही सादर करण्यात आलेला नाही. मात्र तपासणीदरम्यान प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा आढळून आला नाही, अशी माहिती अन्नसुरक्षा विभागाकडून देण्यात आली आहे.


सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने मुदतबाह्य अन्नपदार्थांची विक्री धोकादायक ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी अन्नपदार्थ खरेदी करताना उत्पादनाची मुदत तपासूनच खरेदी करावी, तसेच अशा प्रकारची बाब आढळल्यास संबंधित विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!