Join WhatsApp group

अकोला जिल्ह्यात पेट्रोल माफियांची व्यावसायिक स्पर्धा; प्रशासन झोपेत? नदीम आणि पप्पू यांना कोणाचा आश्रय?

Photo of author

By Sarkarmzanews

Share

लोकवस्तीत असते पेट्रोलचा साठा, अनुचित प्रकार घडल्यास कोण जबाबदार ?

दिनांक २९ जुन २५ :

अकोला जिल्ह्यातील विविध महामार्गांवर सध्या पेट्रोल माफियांचा सुळसुळाट वाढत असून, प्रशासनाच्या डोळ्यादेखत हे अवैध धंदे बेधडक सुरू आहेत. मूर्तिजापूर रस्त्यावरील ढाब्याच्या नावाखाली नदीम नावाचा इसम मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलची तस्करी करत आहे. टँकर चालकांकडून ७० ते ७५ रुपयांना पेट्रोल-डिझेल खरेदी करून तो हे इंधन इतर वाहनचालकांना ८० ते ८५ रुपयांना खुलेआम विकतो आहे.

दरम्यान, नदीमच्या वाढत्या व्यवसायामुळे पप्पू नावाचा दुसरा माफिया देखील स्पर्धेत उतरला आहे. बार्शीटाकळी व पातूर भागात त्याने आपला अवैध इंधन व्यापार सुरू केला असून, अलीकडेच टोल नाक्याजवळ नवीन तळ उभारून त्याने मोठ्या प्रमाणावर तस्करी सुरू करण्याची तयारी पूर्ण केली आहे.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, हे सर्व प्रकार स्थानिक पोलिसांच्या नजरेसमोर घडत असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. बोरगाव मंजू, पातूर, बार्शीटाकळी, पिंजर, मुर्तीजापुर , माना या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत हे अवैध व्यवहार चालू असून, नागरिकांमध्ये अशी चर्चा आहे की पोलिसांना या व्यवहारांची माहिती असूनही ते मूग गिळून बसले आहेत. त्यामुळे या माफियांना कोणाचा आशीर्वाद आहे, असा प्रश्न आता नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.

नवीन जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी पदभार स्वीकारल्यावर सुरुवातीस काहीशी खळबळ निर्माण झाली होती. दुसऱ्याच दिवशी अनेक अवैध दुकाने बंद झाली होती. मात्र काहीच दिवसांत या धंद्यांनी पुन्हा उभारी घेतली असून, ही स्थिती पुन्हा गंभीर बनली आहे. विशेष म्हणजे, नदीम आणि पप्पू यांच्यातील वाढती स्पर्धा पाहता येत्या काळात मोठ्या अनुचित घटनांची शक्यता नाकारता येत नाही.

प्रश्न उपस्थित आहे — हे सर्व माफिया कोणाच्या आश्रयाने इतक्या निर्भयपणे काम करत आहेत? स्थानिक पोलिसांची भूमिका संशयास्पद का वाटते? आणि जिल्हा प्रशासन अशा गंभीर प्रकरणांवर गप्प का आहे?

संपूर्ण जिल्ह्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा गंभीर मुद्दा असून, जिल्हा प्रशासनाने व पोलीस विभागाने तातडीने ठोस पावले उचलणे आवश्यक आहे, अन्यथा कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!